मुंबई : अमेरिकेने भारतावर लावलेल्या मोठ्या टॅरिफनंतर आता या दोन देशातील संबंध सुधारण्याकडे पाऊले टाकली जात आहेत. भारत आणि अमेरिका (US) यांच्यातील व्यापार संबंध (Trade Relations) नव्या टप्प्यावर पोहोचले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचं कौतुक केल्यानंतर आणि मोदींनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आता व्यापार करार (Trade Deal) चर्चेला गती मिळण्याची चिन्हे आहेत.

सोमवार (15 सप्टेंबर 2025) रोजी अमेरिकन व्यापार चर्चेसाठीची (Trade Negotiation) विशेष टीम भारतात दाखल होत आहे. मंगळवार (16 सप्टेंबर 2025) रोजी दोन्ही देशांदरम्यान उच्चस्तरीय बैठक होणार असून अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जातील.

अमेरिका-भारत व्यापार चर्चेला गती

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, भारत-अमेरिका व्यापार चर्चेत प्रलंबित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या चर्चेत परराष्ट्र मंत्रालयाचाही सहभाग असेल कारण काही विषय राजनैतिक स्वरूपाचे आहेत. याशिवाय, युरोपियन युनियन (EU) सोबतही भारत उच्चस्तरीय संवाद साधत आहे.

IPEF फ्रेमवर्कवर होणार चर्चा

या बैठकीत इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी (IPEF) संदर्भात आर्थिक सहकार्य, उत्पादने आणि व्यापार यावर बहुस्तरीय विश्लेषण केले जाईल.

MSME आणि निर्यातीसाठी सरकारचे प्रयत्न

भारत सरकार या व्यापार चर्चेच्या दरम्यान सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) चालना देण्यासाठी "एक्सपोर्ट प्रमोशन मिशन" अंतर्गत प्रयत्न करत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये याची घोषणा झाली असून पुढील सहा वर्षांत निर्यातीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणे आणि छोट्या उद्योजकांना मदत करणे हा उद्देश आहे.

एक्सपोर्ट प्रमोशन मिशनसाठी जादा निधी

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या या मिशनसाठी 2,250 कोटी रुपयांच्या ऐवजी अधिक निधी देण्याचा विचार सुरू आहे. हा मिशन पाच वर्षांच्या काळात चालवलं जाईल. यासंदर्भात मंत्रालयाने सर्व तयारी पूर्ण केली असून लवकरच याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.