बरेली : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेत मास्क न घातल्यामुळं सिक्युरिटी गार्डनं ग्राहकाला गोळी घातल्याची ही घटना आहे. या घटनेत जखमी झालेल्या ग्राहकाला दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. तर गोळी घालणाऱ्या सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. मास्क लावा म्हटल्यानंतर शिवीगाळ केल्यानंतर आमच्यात भांडण झालं यात चुकुन गोळी लागली असं सुरक्षारक्षकानं सांगितलं आहे.  बरेली जंक्शन मार्गावर असलेल्या बॅंक ऑफ बडोदामध्ये ही घटना घडली आहे. 


पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सदर ग्राहक राजेश कुमार आणि सुरक्षारक्षक केशवप्रसाद मिश्र यांच्यात बॅंकेत काही कारणांनी वाद झाला. त्यानंतर हा वाद इतक्या टोकाला पोहोचला की सुरक्षारक्षक केशवप्रसादनं राजेशकुमारला गोळी घातली.  बरेली जंक्शन मार्गावर असलेल्या बॅंक ऑफ बडोदामध्ये ही घटना घडली. बरेलीचे पोलिस अधीक्षक रविंद्र कुमार यांनी सांगितलं की, शुक्रवारी जवळपास 11:30 वाजता राजेश कुमार बँकेच्या कामानिमित्त शाखा परिसरात आला. यावेळी तिथला सुरक्षारक्षक केशव प्रसाद मिश्र आणि राजेश कुमारमध्ये काही कारणावरुन वाद झाला. 


या वादानंतर केशव प्रसाद मिश्रानं रागात येऊन राजेश कुमारला गोळी घातली. जखमी झालेल्या राजेश कुमारला दवाखान्यात दाखल केलं आहे. तो अद्याप बेशुद्ध आहे त्यामुळं त्याची बाजू समजू शकलेली नाही, असं एसपी रविंद्र कुमार यांनी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, राजेश बँकेच्या कामानिमित्त तिथं आला होता. तो शुद्धीवर आल्यावर त्याची बाजू कळू शकेल.  या बँकेच्या वरिष्ठ अधिकारी गीता भुसाल यांनी सांगितलं की, पोलिस आणि फॉरेंसिक टीम सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहेत. ते पाहिल्यानंतर त्यांना घटनेच्या संदर्भात अधिक माहिती मिळू शकेल. 


घटनेची माहिती मिळताच पोलिस महानिरीक्षक बरेली रमित शर्मा, एसएसपी रोहित सिंह सजवाण, एसपी रविंद्र कुमार घटनास्थळी पोहोचले. दरम्यान या प्रकरणी सुरक्षारक्षक केशव प्रसादला अटक केली आहे. केशवप्रसादनं सांगितलं की, ते (राजेश कुमार) ज्यावेळी बँकेत आले, त्यावेळी त्यांनी मास्क लावला नव्हता. त्यांना मास्क लावा म्हटल्यानंतर मला शिवीगाळ केली. यामुळं आमच्यात भांडण झालं. यात चुकुन त्यांना गोळी लागली असं सुरक्षारक्षकानं सांगितलं आहे.