नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील (Delhi) लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाची (Blast) दखल घेत केंद्रीय मंत्रिमंडळाने आज निषेधाचा ठराव संमत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक संपन्न झाली. या बैठकीत दिल्लीतील भीषण स्फोटासंदर्भाने कठोर निषेध करणारा आणि मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहणारा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini vaishnav) यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींची आज रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. तसेच, भुतान दौऱ्यातूनही त्यांनी दिल्लीतील स्फोटावर भाष्य करत हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा दिला होता.
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास एका कारमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली होती. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेनंतर तात्काळ रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली होती. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज जखमींची भेट घेऊन संवाद साधला.
दिल्लीत झालेला हा हल्ला दहशतवादी कटाचा भाग असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून या घटनेनं देश हादरला आहे. त्यामुळेच, दिल्ली स्फोट प्रकरणात केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ठराव संमत केला आहे. त्यानुसार, या स्फोटाचा कठोर निषेध करत आणि मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, या स्फोटाचा सखोल तपास करून कट रचणारे, त्यावर अंमल करणारे आणि त्यांचे पाठीराखे शोधले जातील, असा निर्धार कॅबिनेट बैठकीत करण्यात आला. दरम्यान, दिल्ली स्फोट तपास कामावर सर्वोच्च शासकीय पातळीवरून लक्ष ठेवण्यात आले आहे, अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली.