नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला दिल्लीतील कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केला आहे. बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी 16 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीसाठी उमर खालिद याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश समीर बाजपेयी यांनी उमर खालिद याला 16 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीसाठी जामीन मंजूर केला. 

Continues below advertisement

Umar Khalid : उमर खालिद याला सोशल मीडिया वापरण्यास मनाई

उमर खालिद याचा अंतरिम जामीनाचा अर्ज 20 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि 2 जामीनदारांच्या हमीवर हा अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. उमर खालिद याला जामिनाच्या कालावधीत फक्त त्याच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना आणि मित्रांना भेटता येईल. सोशल मीडिया वापरता येणार नाही.  जामीन कालावधीत उमर खालिद यानं त्याच्या घरी  किंवा ज्या ठिकाणी बहिणीचं लग्न पार पडणार आहे त्या ठिकाणी थांबावं, असं कोर्टानं म्हटलं. 

उमर खालिद याला 14 दिवसांसाठी अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. उमर खालिद यानं 14 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीसाठी अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र त्याला 16 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीसाठी जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. उमर खालिद याच्या बहिणीचं लग्न 27 डिसेंबर रोजी होणार आहे. 

Continues below advertisement

उमर खालिद याला सप्टेंबर  2020 मध्ये अटक करण्यात आली होती. दिल्ली दंगलीप्रकरणी उमर खालिद याला दिल्ली पोलिसांनी अटक केलं होतं. गुन्हेगारी कट, दंगल, बेकायदेशीर पण जमाव जमवणं यासह इतर गुन्ह्यांच्या आरोपावरुन यूएपीए कायद्यान्वये उमर खालिद याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.उमर खालिद याच्या वतीनं  त्रिदीप पैस आणि सन्या कुमार यांनी कोर्टात युक्तिवाद केला. 

उमर खालिद याला यापूर्वी  डिसेंबर 2024 मध्ये सात दिवसांचा अंतरिम जामीन चुलत बहिणीच्या लग्नासाठी मंजूर करण्यात आला होता. 

दरम्यान, सुप्रीम कोर्टानं उमर खालिद आणि इतर पाच जणांच्या जामीन अर्जावरील निर्णय 10 डिसेंबर रोजी राखून ठेवला होता.  उमर खालिद यानं नियमित जामीनासाठी इतर न्यायालयात केलेले जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. तर, काही वेळा उमर खालिद याच्या जामीन अर्जावरील सुनावणी बराच काळ प्रलंबित देखील राहिल्याचं पाहायला मिळालं होतं.