नवी दिल्ली: विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (University Grants Commission-UGC) नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये म्हणजे मॅनेजमेंट, लॉ आणि इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये मल्टिपल कोर्स एन्ट्री-एक्झिट पर्याय देण्यात आला आहे. तसेच त्याच कोर्ससाठी पुन्हा अॅडमिशन मिळवण्याचा पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी एकापेक्षा जास्त कोर्स करता येऊ शकेल. यूजीसीचा हा निर्णय विद्यार्थ्यांना दिलासादायक ठरणारा आहे.
यूजीसीने विद्यार्थ्यांना आता मल्टिपल मोड कोर्सचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. यूजीसीकडून नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या आधारे या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन कोर्सचा पर्यायही उपलब्ध असेल आणि एकाच वेळी त्याला दोन सर्टिफिकेटही मिळणार आहेत. यूजीसीचा हा निर्णय 2022-2023 या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार असून त्यानुसार सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांनी धोरण आखावं असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
यूजीसीच्या या नव्या गाईडलाईन्समुळे विद्यार्थी आता त्यांच्या हिशोबाने वेगवेगळे कोर्स करु शकणार आहेत. यामध्ये सेमिस्टर प्रमाणे वर्गात उपस्थित राहून हे कोर्स करता येऊ शकतील तसेच ऑफलाईन पद्धतीने हे कोर्स करु शकतील. तसेच विद्यार्थ्यांना डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून एकाच वेळी हे कोर्स करता येऊ शकेल.