(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Madhya Pradesh Train Accident : मध्यप्रदेशमध्ये 2 मालगाड्यांची समोरासमोर धडक, एका लोको पायलटचा मृत्यू; अनेक गाड्या रद्द
Madhya Pradesh : मध्यप्रदेशमध्ये 2 मालगाड्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर इंजिनला आग लागली असून एका लोको पायलटचा मृत्यू झाला. अपघातामुळे काही ट्रेन रद्द करण्यात आल्या असून काही ट्रेनचे मार्ग बदलले आहेत.
Madhya Pradesh Train Accident : मध्य प्रदेशमधील सिंगपूर रेल्वे स्थानकाजवळ सकाळी सातच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन मालगाड्या एकमेकांना धडकल्या. मालगाड्या एकमेकांवर आदळून इंजिनलाही आग लागली. या अपघातात एका लोको पायलटचा जागीच मृत्यू झाला, राजेश प्रसाद गुप्ता असे लोको पायलटचे नाव आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मध्य प्रदेशमधील या भीषण रेल्वे अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातामुळे अनेक गाड्यांवर परिणाम झाला आहे. काही ट्रेन रद्द करण्यात आल्या असून, काही ट्रेनचे मार्ग बदलले गेले आहेत. सिंगपूरजवळ झालेल्या अपघातामुळे संपर्क क्रांती कटनी ते बिलासपूर, चिरमिरी कटनी मेमो, अंबिकापूर-जबलपूर, बिलासपूर-कटनी मेमू, बिलासपूर-शहडोल लोकल, नर्मदा इंदोर-बिलासपूर, बरौनी गोंदिया या गाड्यांसह सुमारे अर्धा डझन गाड्या प्रभावित झाल्या आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
1) 08740(BSP-SDL) बिलासपूर-शहडोल मेमू (19 एप्रिल)
2) 08749(SDL-ABKP-) शहडोल-अंबिकापूर मेमू (19 एप्रिल)
3) 08758(ABKP-APR) अंबिकापूर-अनुपपूर मेमू (19 एप्रिल)
4) 08759(APR-MDGR) अनुपपूर-मनेंद्रगढ मेमू (19 एप्रिल)
5) 08739(SDL-BSP) शहडोल-बिलासपूर मेमू (19 एप्रिल)
6) 18756(ABKP-SDL) अंबिकापूर-शहडोल (19 एप्रिल)
7) 18755(SDL-ABKP) शहडोल-अंबिकापूर मेमू (19 एप्रिल)
8) 18234(BSP-INDB) बिलासपूर-इंदूर नर्मदा एक्सप्रेस (19 एप्रिल)
9) 08757(MDGR-ABKP) मनेंद्रगढ-अंबिकापूर मेमू (20 एप्रिल)
10) 08750(ABKP-SDL) अंबिकापूर-शहडोल मेमू (20 एप्रिल)
पुनर्निर्धारित केलेली गाडी
20847 (DURG-UHP) दुर्ग-ऊधमपूर एक्सप्रेस दोन तास उशिराने रवाना होईल.
सिंगपूरला पोहोचण्याआधीच रद्द करण्यात आलेल्या गाड्या
1) 08747 (BSP-KTE) बिलासपूर–कटनी ट्रेन पेंड्रारोडपर्यंत पोहोचल्यानंतर रद्द.
2) 11266 (ABKP-JBP ) अंबिकापूर–जबलपूर ट्रेन बिजुरीपर्यंत पोहोचल्यानंतर रद्द.
3) 11265 (JBP-ABKP) जबलपूर–अंबिकापूर ट्रेन जबलपूर मंडलपर्यंत पोहोचल्यानंतर रद्द.
असा झाला अपघात
सिंगपूर रेल्वे स्थानकाच्या तिसर्या मार्गावर कोळसा भरलेली मालगाडी उभी होती, याच दरम्यान बिलासपूरहून येणाऱ्या मालगाडीने रेड सिग्नल ओलांडला आणि ती मागून धडकली, त्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात मालगाडीच्या एकूण पाच इंजिनांचे नुकसान झाले आहे, बिलासपूर आणि कटनी येथून मार्ग पूर्ववत करण्यासाठी आणि रुळावरील डबे हटवण्यासाठी विविध यंत्रे मागविण्यात येत आहेत.
अपघातस्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी
सिंगपूर रेल्वे अपघाताची पाहणी करण्यासाठी बिलासपूर रेल्वे विभागाचे अधिकारी, जीएम आलोक कुमार आणि डीआरएम प्रवीण पांडे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अपघातानंतर बंद पडलेल्या गाड्या पुन्हा सुरू करण्याला आमचे प्रथम प्राधान्य असेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रेल्वेचे अधिकारी सध्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेत आहेत. सिग्नलचे पालन न झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.