Kalyan Banerjee Attack कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हिंसाचाराच्या घटना सुरु आहेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर सोनारपूरमध्ये काल हल्ला झाला होता. आज तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हुगळीमध्ये हल्ला झाला आहे. हुगळीतील चंडीतला पोलीस स्टेशनसमोर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला असून दगड किंवा बॉल सारख्या वस्तूनं मारुन दुखापत केली गेल्याचा दावा कल्याण बॅनर्जी यांनी केला आहे.
कल्याण बॅनर्जींवर हुगळीत हल्ला
कल्याण बॅनर्जी यांनी चंडीतला पोलीस स्टेशनला निवेदन देण्यास जाताना हल्ला झाल्याचं म्हटलं आहे. लोकशाही पद्धतीनं विरोध केला गेला पाहिजे, असं बॅनर्जी यांनी म्हटलं. तृणमूल काँग्रेसच्या अटक करण्यात आलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोडलं जावं यासाठी निवेदन देण्यासाठी कल्याण बॅनर्जी निघाले होते. मात्र, निवेदन देण्यासाठी पोहोचण्यापूर्वीच तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले त्यांच्यात घोषणाबाजी झाली. भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांविरोधात चोर चोर असा उल्लेख केला. यानंतर वाद वाढला. तर, भाजपकडून कल्याण बॅनर्जी यांच्याकडून नाटक केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अभिषेक बॅनर्जींवर सोनारपूरमध्ये हल्ला
तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्यावर शनिवारी पश्चिम बंगालच्या सोनारपूरमध्ये हल्ला करण्यात आला होता. जमावानं अभिषेक बॅनर्जी यांच्यावर चपला, अंडी आणि दगडफेक केली. अभिषेक बॅनर्जी यांना मारहाण करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. त्यावेळी सुरक्षा दलानं अभिषेक बॅनर्जी यांना हेल्मेट घालायला सांगून सुरक्षितपणे बाहेर काढलं. तृणमूल काँग्रेसनं अभिषेक बॅनर्जींवरील हल्ला हा भाजपचा कट असल्याचं म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसनं केलेले आरोप भाजपकडून फेटाळण्यात आले आहेत.
अभिषेक बॅनर्जी सोनारपूरमध्ये निवडणूक झाल्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये जे लोक मारले गेले होते त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यास गेले होते. त्यावेळी अभिषेक बॅनर्जींवर हल्ला करण्यात आला, त्याचवेळी चोर चोर च्या घोषणाबाजी करण्यात आली होती. अभिषेक बॅनर्जी शनिवारी साडेचार वाजता सोनारपूरच्या कमराबादमध्ये पोहोचले होते. त्यावेळी भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले होते.
