नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सरकारला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं विरोधी पक्षांनी मान्य केलं. बैठकीत सिंह यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पुलवामा हल्ल्याची माहिती दिली. दहशतवादाला देशातूल उखडून टाकण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची विनंती विरोधीपक्षांच्या नेत्यांनी मान्य केली. या बैठकीत एक त्रिसूत्री प्रस्तावही मंजूर करण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, भाकपचे डी. राजा, काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते.



पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली असून, त्या पार्श्वभूमीवर आज संसद भवन परिसरात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी तीन ठराव पास करण्यात  आले.


काय आहे त्रिसूत्री प्रस्ताव

  • 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. या दु:खाच्या देशवासीयांबसोबरच सर्व पक्ष शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.

  • सीमेपलीकडून दहशतवादाला मिळत असलेल्या सर्व प्रकारच्या पाठिंब्याचा आम्ही निषेध करतो.

  • गेल्या तीन दशकांपासून भारत सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा सामना करत आहे. भारतात पसरलेल्या दहशतवादाला सीमेपलीकडून प्रोत्साहन मिळत आहे. भारत या आव्हानाचा मिळून सामना करत आहे. दहशतवादाविरोधातील या लढाईत आम्ही सुरक्षा दलांसोबत संपूर्ण शक्तिनिशी उभे आहोत.


असा रचला पुलवामा हल्ल्याचा कट, काश्मीरच्या खोऱ्यातून स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा