Udaipur Murder : राजस्थानमधील उदयपूरमध्ये ( Udaipur) 10 दिवसांपूर्वी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची तलवारीने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी मंगळवारी भरदिवसा दुकानात घुसले आणि तलवारीने त्याच्यावर अनेक वार करून त्याचा गळा चिरला. या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. एवढेच नाही, तर आरोपींनी घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.


कापडाचे माप देण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश


कन्हैयालाल तेली (४०) यांचे धनमंडी येथील भूतमहालजवळ सुप्रीम टेलर्स नावाचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दोन हल्लेखोर आले. कापड मोजमापाच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला. कन्हैयालालला काही समजेपर्यंत हल्लेखोरांनी त्यांच्यावर एकामागून एक तलवारीने हल्ला केला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.


मुख्यमंत्र्यांकडून व्हिडिओ व्हायरल न करण्याचे आवाहन 


तरुणाच्या हत्येनंतर शहरातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, 'उदयपूरमध्ये तरुणाच्या जघन्य हत्येचा मी निषेध करतो. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार असून पोलीस गुन्ह्याच्या तळापर्यंत जाणार आहेत. मी सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. अशा जघन्य गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. 




गेहलोत यांनी शांतता राखण्याचे आणि व्हिडिओ व्हायरल न करण्याचे आवाहनही केले. ते म्हणाले, 'मी सर्वांना आवाहन करतो की, या घटनेचा व्हिडिओ शेअर करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नका. व्हिडिओ शेअर करून समाजात द्वेष पसरवण्याचा गुन्हेगाराचा हेतू सफल होईल.


एफएसएलची टीम घटनास्थळी पोहोचली


माहिती मिळताच धानमंडीसह घंटाघर, सूरजपोळ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. उच्च पोलीस अधिकारी आणि एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली. पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनीही एसपींना फोन करून घटनेची माहिती घेतली. निष्पक्ष तपास करून आरोपींना लवकर पकडण्यात यावे, असे ते म्हणाले.


सहा दिवसांपासून दुकान उघडले नाही


कन्हैयालाल हा गोवर्धन विलास परिसरात राहत होते. 10 दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर भाजपमधून काढून टाकलेल्या नुपूर शर्माच्या बाजूने पोस्ट केली होती. तेव्हापासून एका विशिष्ट समाजाचे लोक त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. सततच्या धमक्यांमुळे कन्हैयालाल त्रस्त झाला होते. सहा दिवसांपासून त्यांनी टेलरिंगचे दुकानही उघडले नव्हते. 
अर्धा डझन भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


जिल्हाधिकारी ताराचंद मीना, एसपी मनोज चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हातीपोलसह अर्धा डझन भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी आंदोलनासाठी लोकही घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर कुटुंबात हाहाकार उडाला आहे. खेरवाडा येथून अतिरिक्त पोलिस तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. शहरातील 5 भागातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.


पोलिसांकडून रेकॉर्ड तपासणी


एसपी उदयपूर मनोज चौधरी यांनी सांगितले की, माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. निर्घृण हत्या केली. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. कुटुंबाशी सध्या बोलणे झाले नाही. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानंतर धमक्या मिळाल्याच्या तक्रारीच्या प्रश्नावर एसपी म्हणाले की, मृत व्यक्तीशी संबंधित सर्व रेकॉर्ड तपासले जात आहेत. काही आरोपींची ओळख पटली आहे. पथक रवाना झाली आहेत.