Industry Index : आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकात 18.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. मे 2021 मधील आकडेवारीशी तुलना करता मे 2022 मध्ये झालेली वाढ ही मोठी आहे. वीज, सिमेंट, कोळसा आणि खतांशी संबंधित उद्योगांनी मोठी वाढ दर्शवली आहे. मे 2022 मध्ये हा निर्देशांक 148.1 इतका राहिला आहे. कोळसा उत्पादन क्षेत्रात 25.1 टक्क्यांची, खत उत्पादनात 22.8 टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. तर सिमेंट उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांनी 26.3 टक्क्यांची तर उर्जा निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनी 22 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
दरम्यान, सिमेंट, कोळसा,खते आणि वीज निर्मिती क्षेत्रातील उद्योगांनी मे 2022 मध्ये गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत मोठी वाढ नोंदवली आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने मे 2022 साठीचा आठ प्रमुख उद्योगांचा निर्देशांक आज जाहीर केला. या निर्देशांकाच्या माध्यमातून कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि उर्जा निर्मिती या निवडक आठ प्रमुख उद्योगांच्या संयुक्त आणि व्यक्तिगत कामगिरीचे मापन केले जाते. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात या आठ उद्योगांचा 40.27 टक्के वाटा आहे.
फेब्रुवारी 2022 या महिन्यासाठीचा आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाचा अंतिम विकासदर 5.8 टक्क्यांच्या तात्पुरत्या पातळीवरून 5.9 टक्के झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत एप्रिल-मे 2022-23 मध्ये प्रमुख उद्योगांचा निर्देशांक 13.6 टक्के होता.
आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकाची माहिती
कोळसा : मे 2021 च्या तुलनेत कोळसा उत्पादन (भार 10.33 टक्के) मे 2022 मध्ये 25.1 टक्क्यांनी वाढले आहे.
खनिज तेल : मे 2021च्या तुलनेत खनिज तेल उत्पादन (भार 8.98 टक्के) मे 2022 मध्ये 4.6 टक्क्यांनी वाढले.
नैसर्गिक वायू : मे 2021च्या तुलनेत नैसर्गिक वायू निर्मिती (भार 6.88 टक्के) मे 2022 मध्ये 7.0 टक्क्यांनी वाढली आहे.
पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादने : पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादनांची (भार 28.04 टक्के) निर्मिती मे 2021 च्या तुलनेत मे 2022 मध्ये 16.7 टक्क्यांनी वाढली.
खते : मे 2021 च्या तुलनेत खतांचे उत्पादन (भार 2.63 टक्के) मे 2022 मध्ये 22.8 टक्क्यांनी वाढले.
पोलाद निर्मिती : मे 2021च्या तुलनेत पोलाद निर्मिती (भार 17.92 टक्के) मे 2022 मध्ये 15.0 टक्क्यांनी वाढली
सिमेंट उत्पादन : मे 2021च्या तुलनेत सिमेंटचे उत्पादन (वजन 5.37 टक्के) मे 2022 मध्ये 26.3 टक्क्यांनी वाढले.
वीज निर्मिती : मे 2021च्या तुलनेत वीज निर्मिती (वजन 19.85 टक्के) मे 2022 मध्ये 22.0 टक्क्यांनी वाढले आहे.