नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर मोदी सरकार आणखी एक दणका देण्याची शक्यता आहे. कारण, नोटाबंदीनंतर सरकार नाणेबंदीच्या निर्णयाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यासाठी नोएडा, मुंबई, कोलकाता आणि हैदराबादमधील टाकसाळीत नाणी पाडण्याची कामं थांबवण्यात आली आहेत.


रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून या चारही टाकसाळींना नाणी पाडण्याचं काम थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोटाबंदीनंतरचा हा आणखी एक दणका असल्याचे मानले जात आहे.

नाणेबंदीसंदर्भात असंही एक कारण दिलं जात आहे, ते म्हणजे नोटाबंदीनंतर देशभरातील विविध टाकसाळीत मोठ्या प्रमाणात नाणी पाडण्यात आली होती. पण ही नाणी अजूनही मोठ्या प्रमाणात रिझर्व बँकेत स्टोअर करुन ठेवण्यात आली आहेत.

रिझर्व बँकेच्या एका नोटीसमधूनही याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे. 8 जानेवारीच्या या नोटिसीमध्ये म्हटलंय की, “MPC (चलनविषयक धोरण समिती)कडे 2500 लाखापेक्षा जास्त नाणी स्टोअर आहेत. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत टाकसाळीत नाणी पाडण्याचं काम थांबवण्यात यावं,” असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. पंतप्रधानांच्या घोषणेमुळे 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. मोदी सरकारचा हा निर्णय म्हणजे, भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरोधात जोरदार वज्रप्रहार असल्याचे सांगितले जात होतं. या निर्णयाच्या घोषणेनंतर बराच काळ सर्वत्र गोंधळाची स्थिती होती. पण तरीही सर्वांनी याचं स्वागत केलं होतं.

पण दुसरीकडे मोदीच्या निर्णयानंतर सरकारने चलनात आणलेल्या 500 आणि 2000 रुपयाच्या नव्या नोटांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. अनेक नामांकित अर्थतज्ज्ञांनी यावर टीका केली होती. तर विरोधकांनी सरकार या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरल्याची टीका केली होती.