जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या घटना वाढल्या असतानाच पुन्हा एकदा लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. शोपियान जिल्ह्यात लष्कराच्या जवानांचे गस्तीपथक तैनात होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात दोन जवानांसह एक नागरीक जखमी झाला आहे.


दुसरीकडे कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर लष्करानं सर्वात मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे.

3 हजारहून अधिक जवान खोऱ्यातील 20हून अधिक गावांमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, लष्कर-ए-तौयबाचा खतरकनाक दहशतवादी जुनैद मट्टू आपल्या 2 साथीदारांसह कुलगाममधल्या गावात लपून बसला आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.