हैदराबाद :  तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी (27 ऑक्टोबर) दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनसह 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


मोहम्मद अझरुद्दीन यांना हैदराबाद शहरातील जुबली हिल्स मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार मधु गौर यक्षी यांना लाल बहादूर नगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. तसेच पूजाला हरिकृष्ण यांना मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या विरोधात सिद्धीपेट मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.


काँग्रेसने मुनुगोडे येथून राजगोपाल रेड्डी, महबुाबादमधून मुरली नाईक आणि अंबरपेटमधून रॉबिन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. तेलंगणातील 119 पैकी 100 जागांवर पक्षाने उमेदवार उभे केले आहेत. राज्यातील सर्व जागांसाठी एकाच टप्प्यात ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.


 मोहम्मद अझरुद्दीन यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून 2009 साली त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. सध्या अझरुद्दीन तेलंगणा  काँग्रेसचे  कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. 


 






गेल्या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळाल्या?


तेलंगणातील 2018 च्या विधानसभा निवडणुकीत KCR यांच्या BRS (तत्कालीन TRS) ला बहुमत मिळाले. BRS ने 119 पैकी 88 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसच्या 19 जागा कमी झाल्या.


याशिवाय असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनने (एआयएमआयएम) सात जागा जिंकल्या होत्या. भाजपला केवळ एक जागा मिळाली होती. तुम्हाला सांगतो की, सध्या राज्यात KCR यांच्या नेतृत्वाखाली BRS सरकार आहे.


दरम्यान,  तेलंगणामध्ये विजय मिळवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सत्ताधारी  भारत राष्ट्र समितीचे अनेक नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. शुक्रवारी, 27 ऑक्टोबर रोजी बीआरएसच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 


काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये माजी मंत्री मोतुपल्ली नरसिंहुलू, माजी खासदार कोमातीरेड्डी राजगोपाल रेड्डी, माजी आमदार एनुगु रवींद्र रेड्डी, माजी आमदार नेथी विद्यासागर, माजी आमदार संतोष कुमार, माजी आमदार अकुला ललिता, माजी आमदार कपिलवाई दिलीप कुमार आणि नीलम मधु यांचा समावेश आहे.


 






या नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसला अधिक बळ मिळाले आहे. राज्यातील भ्रष्ट बीआरएस सरकारला जनता कंटाळली असल्याचे काँग्रेसने म्हटले.