मुंबई : हिंदुत्वाचा मुद्दा तापवून केवळ राज्यच नव्हे तर केंद्रातही सत्ता प्राप्त करता येते हे भाजपने दाखवून दिले आहे. बाबरी पतन ते अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर असा मोठा पल्ला भाजपने पार पाडलेला आहे. 2014 पासून सलग दोन वेळा भाजपने केंद्रात सत्ता प्राप्त केली आहे. सध्या अयोध्येत राम मंदिराचे काम सुरु करण्यात आले असून 2024 मध्ये भाजपला त्याचा फायदा नक्कीच होणार हे सांगायला कोणाही ज्योतिषाची गरज नाही. काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करणे हे एक मोठे आणि ऐतिहासिक पाऊल नरेंद्र मोदी सरकारने उचलले होते आणि त्याचा त्यांना फायदा होतानाही दिसत आहे. देशातील अन्य राज्यांमध्येही भाजप आक्रमक हिंदुत्वाचा पुकारा करुन हिंदू मतांची बेगमी करीत आहे. महाराष्ट्रातही शिवसेनेचे हिंदुत्व कसे बेगडी आहे हे सांगण्यावरही भाजप भर देत आहे.


दक्षिणेतही यश मिळावे म्हणून भाजप हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे पुढे करत आहे. हैदराबादच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने हिंदुत्वाचा मुद्दाच पुढे केला आणि चांगले यश मिळवले. गेल्या वर्षी आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला होता. भाजपाने आंध्रमध्ये चांगले यश मिळवले पण सत्तेपासून लांबच राहिली. परंतु भाजपच्या मतविभागणीमुळे चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देसम पार्टीची मात्र निवडणुकीत पुरती वाट लागली होती. वायएसआर काँग्रेसने सत्ता प्राप्त करुन चंद्राबाबूंना चांगलाच धक्का दिला होता. जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदी येताच केंद्रात नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कधी एनडीएचा घटक असलेले चंद्राबाबू नायडूही हिंदुत्वाचा राग अलापून भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करु लागले असल्याचे दिसत आहे. राज्यात हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन भाजपापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न चंद्राबाबू नायडूंनी सुरु केला असून हिंदू मंदिरांवरील हल्ले आणि सरकारचे ख्रिश्चन तुष्टीकरण यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे हे नवे रुप पाहून सगळेच चकित झालेले आहेत.


आंध्र प्रदेशमध्ये 20 टक्के हिंदू मतदार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आंध्र प्रदेशमधील हिंदू मंदिरांवर हल्ले होत असल्याने विरोधी पक्षांनी या हल्ल्यांना वायएसआर सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वीच रामतीर्थ धाममध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती तोडण्यात आली होती. एवढेच नव्हे तर हिंदूंचे धर्मांतरणही मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याचा आरोपही विरोधी पक्षातर्फे केला जात आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी राज्यात ख्रिश्चन धर्म वाढवण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे. सरकार घटनेच्या विरोधात जाऊन ख्रिश्चन मिशनरींना महिना पाच हजार रुपये देऊन चर्चचे व्होट बँकेत रुपांतर करत असल्याचा आरोपही चंद्राबाबू यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर एका पोलीस स्टेशनमध्ये ख्रिसमसचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा तर झालाच, एका मंदिरात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्याचेही चंद्राबाबूंचे म्हणणे आहे. प्रभू श्रीरामांची मूर्ती तोडण्याच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी या भागाचा दौरा करताना केली.


चंद्राबाबू नायडू त्यांचे राजकीय अस्तित्व कायम ठेवण्यासाठी हिंदुत्वाचा राग अलापू लागले असल्याचा आरोप वायएसआर काँग्रेसने केला आहे. चंद्राबाबू यांच्या मनात कोणत्याही धर्माबाबत प्रेम नाही. खरेतर चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यकाळातच राज्यात 40 मंदिरे तोडण्यात आल्याचा आरोपही वायएसआरचे आमदार अंबाती रामबाबू यांनी केला आहे. वायएसआरपाठोपाठ भाजपनेही चंद्राबाबूंच्या या नव्या भूमिकेवर टीका करताना चंद्राबाबू नायडू यांची कोणतीही विचारधारा नाही. ते वेळ आणि गरज पाहून भूमिकेत बदल करतात अशी टीका केली आहे. चंद्राबाबू नायडू यांनी निवडणूक जाहीरनाम्यात चर्च बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. एवढेच नव्हे तर सत्तेवर असताना ख्रिसमसमध्ये मोफत वस्तू वाटल्याचेही भाजपने म्हटले आहे.


चंद्राबाबू नायडू दोन वेळा एनडीएचे घटक होते. आंध्र प्रदेशमधील सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी ते एनडीएच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून ते हिंदुत्वाचा राग अलापू लागल्याचे आंध्र प्रदेशमधील राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. एकूणच आंध्र प्रदेशमध्ये हिंदुत्वाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरु झाले असून 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी यात खूप काही घडताना दिसेल यात शंका नाही.