नवी दिल्ली : आंदोलनाच्या लक्षवेधक स्टाईल आपल्यासाठी काही नव्या नाहीत. अनेक नेते, अनेक संघटना आपापल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हटके पद्धती अवलंबत असतात. टीडीपीच्या खासदारानेही अशीच हटके स्टाईल अवलंबली आहे. ते चक्क हुकूमशाह हिटलरच्या वेशात संसदेत आले.
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी हे अभिनव आंदोलन टीडीपीचे खासदार शिवप्रसाद यांनी केले. खरंतर ते गेल्या काही दिवसांपासून आपल्या मागणीसाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत.
आज हिटलरच्या वेशात ते आले आणि एक प्रकारे मोदी नेमकं कुठल्या पद्धतीने कामकाज करता येते हे त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. शिवप्रसाद यांनी याच्या आधी राम, कृष्ण सत्यसाईबाबा, नारदमुनी असे विविध अवतार संसदेत घेतलेले आहेत.
अशी आगळी-वेगळी वेशभूषा करुन आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आंध्र प्रदेशच्या याच मागणीवर टीडीपीने अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला होता. विश्वास प्रस्ताव सरकारने जिंकला, तरीही शिवप्रसाद यांचे हे आंदोलन थांबलेले नाही. रोज ते कुठल्या वेशभूषेत संसदेत येतात, याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. आज जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्या वेशात येऊन त्यांनी धमाल उडवून दिली.
शिवप्रसाद हे अभिनयातून राजकारणात आले आणि नंतर खासदार झाले. आंध्र प्रदेशमधल्या चित्तूर येथून ते खासदार आहेत.