चेन्नई : शाळेत असताना प्रत्येक जण आपल्या शिक्षकांची टिंगल-टवाळी करत असतो. तसंच कुठल्यातरी शिक्षकाबद्दल आपल्या मनात आदर, हळवा कोपराही असतो. याच ओढीने निरोप समारंभाच्या वेळी डोळ्यांच्या कडा ओलावतात. तामिळनाडूत लाडक्या शिक्षकाची बदली झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी रडून हैदोस घातला. त्यांच्याभोवती कडं घालून त्यांना थांबवण्याचाही आटोकाट प्रयत्न केला.

फोटोत राखाडी रंगाचा शर्ट आणि पँट घातलेल्या अवघ्या 28 वर्षांच्या या तरुणाकडे सध्याच्या घडीला प्रचंड श्रीमंती आहे... आणि ही श्रीमंती आहे विद्यार्थ्यांच्या प्रेमाची, मायेची.

तामिळनाडूतल्या थिरुवल्लूरमध्ये वेलिआग्राम गावातल्या सरकारी शाळेत इंग्रजी शिकवणारा हा युवक म्हणजे जी. भगवान. सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना भगवान इंग्रजी विषय शिकवतो. त्याच्या बदलीची ऑर्डर निघाली आणि भगवान मास्तरांच्या विद्यार्थ्यांच्या काळजाचं पाणी-पाणी झालं. भगवानची बदली अरुणगुलम गावातील शाळेत झाली.

भगवानच्या निरोपाचा क्षण आला आणि त्याचे विद्यार्थी धाय मोकलून रडायला लागले. कोणी त्याला मिठ्या मारल्या, कोणी त्याच्या हाताला धरुन थांबवलं, तर कोणी त्याच्याभोवती कडं घालून त्याला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

विद्यार्थ्यांचं प्रेम पाहून भगवानलाही अश्रू अनावर झाले. एकीकडे विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून गंगा-जमुना वाहत असताना, भगवानच्या डोळ्यांना पूर आला.


या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. स्थानिक वृत्तवाहिन्यांनीही ही बातमी दाखवली आणि प्रशासन हेलावलं. भगवानच्या बदलीला दहा दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. त्याची बदली करायची की नाही, याबाबत या कालावधीत निर्णय घेतला जाणार आहे.

आपल्या लाडक्या शिक्षकाची बदली होणार असल्याची कुणकुण विद्यार्थ्यांना लागली आणि जणू आंदोलनच सुरु झालं. प्रशासनाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी मंगळवारी शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पालकांनीही आपल्या मुलांच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

'ही माझी पहिलीच नोकरी. 2014 मध्ये वेलिआग्राम गावातल्या सरकारी शाळेत माझी नियुक्ती झाली. खरं तर विद्यार्थी आणि शिक्षकांचं गुणोत्तर पाहिलं, तर मी अतिरिक्त कर्मचारी आहे. त्यामुळे ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे, तिथे माझी बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला.' असं भगवानने सांगितलं.

'ते मला धरत होते, माझ्या पाया पडत होते. त्यांना बघून माझा धीरच सुटला. मी त्यांना शाळेच्या हॉलमध्ये घेऊन गेलो आणि समजावलं की मी काही दिवसात परत येईन.' असं भगवान कौतुकाने सांगतो.

'शिक्षणापलिकडे अनेक गोष्टींबाबत मी विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. गोष्टी सांगतो, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतो. भविष्याविषयी बोलतो, प्रोजेक्टरवर विषय समजावून सांगतो, अशा गोष्टींमुळे आमच्यात बंध निर्माण झाले. शिक्षकापेक्षाही मी त्यांचा मित्र आहे, दादा आहे' असं सांगताना भगवानचे डोळे पाणावले.

भगवानसोबत विद्यार्थ्यांचं पालकांसारखं नातं निर्माण झालं आहे. त्यामुळे बदलीचा निर्णय होताच, त्यांच्या भावना अनावर झाल्या, असं शाळेचे मुख्याध्यापक ए अरविंद यांनी सांगितलं.