Tamilnadu Election 2026: तमिळनाडूचे राजकारण सध्या एका ऐतिहासिक वळणावर उभे आहे. गेल्या सहा दशकांपासून या राज्याने आलटून-पालटून फक्त द्रविडी विचारधारेच्या DMK (द्रविड मुन्नेत्र कळघम) आणि AIADMK (ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम) या दोन पक्षांनाच तमिळ जनतेनं सत्तेचं सिंहासन दिले आहे. मात्र, 2026 च्या आगामी विधानसभा निवडणुकीने ही समीकरणे बदलणार की परंपरा तीच राहणार याची उत्सुकता आहे. 23 एप्रिल 2026 रोजी होणारे मतदान हे ठरवेल की, तमिळ जनता पुन्हा एकदा द्रविडी परंपरेला साथ देते की नवा इतिहास घडवते. 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
स्टॅलिन यांचा गड आणि उदयनिधींचे नेतृत्व
मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन सध्या मजबूत स्थितीत आहेत. 2021 च्या विजयानंतर त्यांनी आपल्या 'द्रविडी मॉडेल'च्या माध्यमातून जनमत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. स्टॅलिन यांनी त्यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवून पक्षाची धुरा भविष्यासाठी सुरक्षित केली आहे. सध्या DMK कडे 16व्या विधानसभेत 133 हून अधिक जागांचे बहुमत असून, ते काँग्रेस आणि डाव्या पक्षांसोबत पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज आहेत. मात्र, प्रस्थापितविरोधी लाट (Anti-incumbency) आणि भ्रष्टाचाराचे आरोप हे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे.
जयललितांच्या पक्षाची (AIADMK) फरपट
अम्मा अर्थात जयललिता यांच्या निधनानंतर AIADMK विखुरलेला दिसत आहे. एडप्पाडी के. पलानीस्वामी (EPS) यांनी पक्षावर पकड मिळवली असली तरी, पन्नीरसेल्वम (OPS) आणि शशिकला यांच्याशी असलेल्या अंतर्गत वादामुळे पक्षाची ताकद कमी झाली आहे. गेल्या निवडणुकीत केवळ 60-66 जागांवर समाधान मानावे लागलेल्या या पक्षाला पुन्हा उभारी मिळवण्यासाठी एखाद्या मोठ्या मित्रपक्षाची किंवा करिश्माई नेतृत्वाची गरज आहे. भाजपने पुन्हा एकदा त्यांच्याशी हातमिळवणी केली असली तरी, जागावाटपावरून अद्याप पेच कायम आहे.
भाजपचे 'मिशन तमिळनाडू' आणि 60 वर्षांचा दुष्काळ
1967 मध्ये काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर एकाही राष्ट्रीय पक्षाला तमिळनाडूमध्ये स्वतःच्या बळावर सत्ता मिळवता आलेली नाही. भाजपने हा 60 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. माजी पोलीस अधिकारी के. अन्नामलाई यांच्या रूपाने भाजपने राज्यात एक आक्रमक चेहरा दिला आहे. भाजप सध्या तमिळ अस्मितेशी हिंदू धर्माची जोड घालून (उदा. काशी तमिळ संगमम) 'द्रविडी राजकारणा'ला 'राष्ट्रवादी' पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहे.
भाजपची विजय यांना 'मोठी ऑफर'?
या सर्व नाट्यात सुपरस्टार विजय यांच्या 'तमिळगा वेट्ट्री कळघम' (TVK) पक्षाने एन्ट्री घेतली आहे. विजय यांनी DMK ला 'राजकीय शत्रू' आणि भाजपला 'वैचारिक शत्रू' घोषित केले आहे. तरुणांमध्ये विजय यांची प्रचंड लोकप्रियता असून, ते प्रस्थापित पक्षांची मते खाण्याची दाट शक्यता आहे. भाजपने विजय यांना सोबत घेण्यासाठी मोठी ऑफर दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने त्यांना 80 जागा आणि उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. भाजपला माहित आहे की, विजय यांच्याकडे असणारी तमिळ तरुणांची ताकद आणि चाहत्यांची मोठी फळी मतांचे समीकरण बदलू शकते. तथापि, विजय यांनी अद्याप तरी 'एकला चलो रे' ची भूमिका घेतली असून, त्यांनी भाजपच्या उजव्या विचारधारेला कडाडून विरोध केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
