Tamilnadu Assembly Election 2021 : तमिळनाडू विधानसभेच्या निवडणूक प्रचारात डीएमके उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेली एक विनंती सध्या चांगलीच चर्चेत आहे. खरंतर डीएमके-काँग्रेस युती ही भाजप-एआयडीएमके युती विरोधात निवडणूक लढते आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी डीएमकेच्या अनेक उमेदवारांनी ट्विटरवर मोदींना आपल्या विरोधातल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येण्याची विनंती केली. 


मोदी जर तुम्ही आमच्या विरोधात सभा घेतलीत तर आमच्या विजयाचं मार्जिन वाढेल अशा आशयाचं हे ट्वीट अनेक प्रमुख उमेदवारांनी ट्विटरवर करून मोदींना त्यात टॅग ही केलं होतं. एकापाठोपाठ एक प्रमुख उमेदवारांनी केलेल्या या विनंतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण तमिळनाडूमध्ये भाजपच्या प्रचारासाठी सभा घेण्यासाठी येणार होते त्याच दिवशी द्रमुकने सोशल माध्यमावर हे अनोखं अभियान सुरू केलं. 






तामिळनाडूमध्ये गेल्या दहा वर्षांपासून एआयडीएमकेची सत्ता आहे. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 39 पैकी 38 जागा जिंकणाऱ्या डीएमकेचं पारडं यावेळी जड मानले जात आहे. देशात इतरत्र जरी मोदी लाट असली तरी तामिळनाडूमध्ये मात्र मोदींच्या विरोधात प्रचार करून डीएमकेने यश मिळवलं होतं. आता यावेळी विधानसभेत काय होतंय याची उत्सुकता असेल.







जयललिता आणि करुणानिधी हे दोन्ही बाजूचे बडे नेते नसलेली ही तमिळनाडूची पहिलीच निवडणूक आहे. विधानसभेच्या 234 जागांसाठी तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात 6 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे.