मुंबई : तामिळनाडू येथील एका महिला अधिकाऱ्याचा (Tamil Nadu Woman Police Inspector) एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामागचं कारण देखील तसंच आहे. महिला पोलिस अधिकारी पुष्पाराणी या पोलिस ड्रेसवर  सायकलवरून दुचाकी आणि बैलगाडींच्या मधून रस्ता काढत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर काही जण म्हणत आहेत की, ही महिला पोलिस आता या वयात सायकल शिकत आहे. तर काहींनी अजून वेगळ्या कमेंट करत तिची खिल्ली उडवली आहे. परंतु, तिने लोकांच्या कमेंट्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. पुष्पाराणी सायकलवरून तामिळनाडू येथील फूलबाजार पोलिस ठाण्यात पोहोचते. 


1997 च्या बॅचच्या पोलिस अधिकारी पुष्पाराणी यांनी तामिळनाडू विशेष पोलिस आणि नंतर सशस्त्र राखीव दलात ग्रेड II कॉन्स्टेबल म्हणून सुरुवात केली. त्या सांगतात ''मी पुडुपेट आर्म्ड रिझर्व्हमध्ये असताना सायकलने काम करायला सुरुवात केली होती. माझे वडील गोविंदासामी सेवानिवृत्त एसआय तेही सायकलवरून कामावर जात असतं. त्यांनी मला सुरक्षितपणे सायकल कशी चालवायची हे शिकवले. त्यानंतर मी माझी सायकल चालवणं सोडलं नाही."


पुष्पाराणी यांच्या कारकिर्दीचा बराचसा काळ शहरातील विविध महिला पोलिस ठाण्यात गेलाय. त्या सांगतात "सायकलिंगमुळे मला ऊर्जा मिळते आणि अनेक आजार दूर होतात. मी दररोज घर ते ऑफिस जवळपास सहा किलोमीटरचे अंतर सायकल चालवते. याशिवाय मी आयुक्त कार्यालय आणि इतर कर्तव्याच्या ठिकाणी सायकलने फिरते. पोलिस खात्यातील अनेक जण मला बाईक घेण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करत असले तरी सायकल चालवण्याची माझी इच्छा कायम आहे. ही माझी सातवी सायकल असून ती मला पोलिस आयुक्त शंकर जिवल यांनी भेट दिल्याचे त्यांनी सांगितले.  


पुष्पाराणी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या दोघांनाही त्या सायकलने शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त करतात. शिवाय त्या ज्या परिसरात राहतात त्या परिसरातील अनेक महिलांमध्ये सायकलिंग करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. पुष्पाराणी सांगतात, श्रीमंतांसाठी सायकल हे व्यायामाचे साधन आहे, पण गरिबांसाठी ते उपजीविकेचे साधन आहे.    


फूलबाजार पोलिस ठाण्याचे वाहतूक तपास निरीक्षक डी इंद्रा यांनी सांगितले की, पुष्पाराणी यांच्यापासून प्रेरित होऊन अनेकांनी सायकल चालवण्यास सुरुवात केली. विशेषत: महिलांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळते.   


महत्वाच्या बातम्या


SC Collegium : मद्रास उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीला विरोध, याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी