Tamil Nadu Nilgiris Coonoor Bus Accident : तामिळनाडूमध्ये मोठी बस दुर्घटना घडली आहे. निलगिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर येथे भीषण अपघात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये बसचालकासह 59 प्रवासी होती. ही पर्यटक बस कुन्नूरमधून तेनकासीच्या दिशेने जात होती. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी या बसला अपघात झाला.

Continues below advertisement

बस दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूमधील मारापलमजवळ पर्यटक बस दरीत कोसळल्याने 8 जणांचा मृत्या झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. कुन्नूरमधील बस अपघातातील जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. पर्यटक बस कुन्नूरमधील मारापलमजवळ दरीत कोसळली. या बसमधील पर्यटक उटी फिरण्यासाठी गेले होते आणि परतताना या बसला अपघात झाल्याची माहिती आहे.

बसचालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात

कोयंबटूर झोनचे उपमहानिरीक्षक सरवण सुंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात प्रकरणी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरु आहे. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बसचालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर बस मारापलम येथील 100 फूट दरीत कोसळली.

मृतांमध्ये 3 महिला आणि पाच पुरुषांचा समावेश

अपघाताची बातमी मिळताच स्थानिक आणि स्थानिक अधिकारी आणि बचाव कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर बचावकार्य राबवण्यात आले. बचावलेल्या प्रवाशांपैकी आठ प्रवाशांना रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आलं. इतर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

शनिवारी, 30 सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील मारापलमजवळ पर्यटक बस दरीत कोसळून तीन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कुन्नूर सरकारी रुग्णालयाचे सहसंचालक पलानी सामी यांनीही 8 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये तीन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 8 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.