हैदराबाद : तेलंगाणातील भाजपचे आक्रमक आमदार अशी ओळख असलेल्या आमदार टी राजा सिंह यांनी मोठा निर्णय घेतला आहे. टी राजा सिंह यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. टी राजा सिंह हे गोशामहाल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. भाजपनं प्रदेशाध्यक्ष पदावर एन. रामचंद्र राव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. टी राजा सिंह या निर्णयामुळं नाराज झाले आहेत. या नाराजीमुळं त्यांनी प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांना राजीनामा पाठवल्याची माहिती आहे.
टी राजा सिंह यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना म्हटलं की लाखो कार्यकर्त्यांचा आवाज असून हा निर्णय वेदनादायी असूनही आवश्यक होता. राजा सिंह यांनी तेलंगाणातील भाजप नेते जी किशन रेड्डी यांना पत्र लिहिलं आहे त्यात म्हटलंय की एन. रामचंद्र राव यांच्या नियुक्तीनं पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये निराशा पसरली आहे. केंद्रीय नेतृ्त्वाची दिशाभूल करुन हा निर्णय घेतला गेला आहे. वैयक्तिक स्वार्थानं ते प्रेरित आहेत, असं टी राजा सिंह म्हणाले.
राजा सिंह यांनी भाजपपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला असेल तरी हिंदुत्त्वाच्या विचारधारेशी असलेलं बांधिलकी कायम जपणार असल्याचं म्हटलं. धर्माची सेवा देखील बदलणार नाही. हिंदू समुदायाचा आवाज उठवणं त्यासाठी उभं राहणं मोठ्या ताकदीनं सुरु ठेवणार असं टी राजा सिंह म्हणाले.
टी राजा सिंह यांनी हा निर्णय अवघड असला तरी गरजेचा होता असं म्हटलं. तेलंगाणात भाजप सत्ता स्थापन करण्याच्या उंबरठ्यावर होती. मात्र, चुकीच्या नेतृत्त्वाच्या निवडीमुळं ती संधी हातातून जात असल्याचं पाहायला मिळतं. भाजप सोडलं तरी हिंदुत्त्वाचे विचार आणि गोशामहालच्या लाखो लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचं टी राजा सिंह म्हणाले.
टी राजा सिंह यांनी माझं हे पाऊल पार्टीच्या विचारधारेविरोधात नसून नेतृत्त्वाच्या निर्णयांविरोधात आहे. मी हिंदू समुदायासोबत ताकदीनं आणि मजबुतीनं उभं राहणार असल्याचं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, अमित शाह आणि बीएल संतोष यांनी निर्णयावर फेरविचार करावा, असं राजा सिंह म्हणाले.
कोण आहेत टी राजा सिंह?
टी राजा सिंह हे भाजपमध्ये असले तरी आक्रमकपणे हिंदुत्वाची बाजू मांडताना पाहायला मिळाले आहेत. महाराष्ट्रात देखील त्यांच्या भाषणाचं आयोजन अनेकदा करण्यात आलं होतं. टी राजा सिंह यांनी यापूर्वी 2018 मध्ये देखील भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र, पक्षानं तो राजीनामा स्वीकारला नव्हता.