Suvendu Adhikari News : साधुसंतांचा आणि ऋषीमुनींचा अपमान केल्यास तुरुंगवासाची शिक्षा होईल, असा इशारा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिला आहे. बंगालमध्ये टिळा, शेंडी, तुळसी आणि धोतराचं सरकार असल्याचे ते म्हणाले. आता सरकार बदलले आहे, काळ बदलला आहे आणि आता भीती बाळगण्याचं कोणतही कारण नाही असे ते म्हणाले. बागेश्वर बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांचा फोटो जाळल्याप्रकरणी एका काँग्रेस नेत्याला अटक करण्यात आली होती. यानंतर हजारो संतांसमोर मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी स्पष्टपणे सांगितले, तुम्ही संत आणि महंतांचा अपमान केल्यास तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागेल असे ते म्हणाले.
सरकार गाईचे संरक्षण करेल
धीरेंद्र शास्त्री यांनी नुकताच राज्याचा दौरा केला आणि दुर्गापूजेदरम्यान मांसाहार करण्यास आक्षेप घेतला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात वाद निर्माण झाला. भवानीपूरच्या रस्त्यांवर निदर्शने झाली, जिथे बागेश्वर बाबांच्या मूर्ती जाळण्यात आल्या. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. रविवारी, कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये 11000 लोकांच्या उपस्थितीत गीतेचे पठण आयोजित करण्यात आले होते. अधिकारी यांनी स्पष्ट संदेश दिला की, सरकार गाईचे संरक्षण करेल आणि संत व ऋषीमुनींचा अपमान करणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल असे ते म्हणाले.
29 सप्टेंबरला 10 लाख लोकांच्या उपस्थितीत गीता पठणाचे आयोजन
29 सप्टेंबरला 10 लाख लोकांच्या उपस्थितीत गीता पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आरएसएस प्रमुख मोहन भागवत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बागेश्वर बाबा येणार आहेत. संत, महंत आणि महाराज आपले मत मांडतील. ते सनातन धर्माचा महिमा पसरवतील. हा एक स्वतंत्र देश आहे. संविधान जे करू दिले, ते ते करतील. पण ज्या प्रकारे धीरेंद्र शास्त्रींचा अपमान झाला, ज्या प्रकारे कम्युनिस्ट आणि जमातींनी, म्हणजेच ममतांच्या लोकांनी, त्यांचा अपमान केला, त्यावर सरकारने कारवाई केली आहे असेही ते म्हणाले.
आता तुम्हाला हवी तितकी गीता वाचा, हनुमान चालिसा म्हणा
आता तुम्हाला हवी तितकी गीता वाचा, हनुमान चालिसा म्हणा, हरे कृष्ण मंत्राचा जप करा. शंखनाद करा. ढोल वाजवा. भीती नाही. काळ बदलला आहे. टिळा, शेंडा, धोती आणि तुळशी यांचे सरकार आले आहे. आता सरकार गाईचे रक्षण करण्यासाठी आले आहे. सर्वांनी एकत्र यावे असे ते म्हणाले.
