Jaish-e-Mohammed Terrorist Arrested: स्वातंत्र्य दिनापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसला मोठे यश मिळाले आहे. एटीएसने सहारनपूर येथून दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी स्वातंत्र्यदिनी मोठा हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव मोहम्मद नदीम असून तो पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि तेहरीख-ए-तालिबानशी थेट संपर्कात होता. त्याला नुपूर शर्मा यांची हत्या करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, पण त्या आधीच त्याला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.


अटक करण्यात आलेल्या नदीम याच्या ताब्यातून एक मोबाईल, दोन सिम आणि प्रशिक्षण साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या साहित्यात विविध प्रकारचे आयडी, बॉम्ब बनवण्याचे तंत्र आणि आत्मघाती हल्ल्यांशी संबंधित प्रशिक्षण अभ्यासक्रमांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान, नदीम जेईएम आणि टीटीपी दहशतवाद्यांच्या थेट संपर्कात होता आणि आत्मघाती हल्ल्याची तयारी करत होता. एटीएसने त्याच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 121ए आणि 123 आणि बेकायदेशीर गतिविधी (प्रतिबंध) कायद्याच्या कलम 13, 18 आणि 38 अंतर्गत लखनौ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी दावा केला आहे की, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, आयएमओ, फेसबुक मेसेंजर, क्लबहाऊसच्या माध्यमातून नदीमचा जैश आणि टीटीपी दहशतवाद्यांशी संबंध आहे. त्याने परदेशी दहशतवाद्यांना 30 पेक्षा जास्त व्हर्च्युअल नंबर, सोशल मीडिया आयडी बनवून दिले होते. टीटीपीच्या पाकिस्तानी दहशतवाद्याने नदीमला सोशल मीडियाच्या माध्यमातून आत्मघाती हल्ल्याचे प्रशिक्षण दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद नदीमने चौकशीदरम्यान सांगितले की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कार्यरत असलेले JeM आणि TTP दहशतवादी त्याला विशेष प्रशिक्षणासाठी बोलावत होते. ज्यावर तो व्हिसा घेऊन पाकिस्तानात जात होता आणि जैश-ए-मोहम्मदकडून प्रशिक्षण घेऊन पुन्हा देशात परतत होता.


नदीमने चौकशीदरम्यान कबूल केले की जैश-ए-मोहम्मद आणि तहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांनी नुपूर शर्मा यांची हत्या करण्याचे काम त्याला दिले होते. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित यांच्यावर केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या. नदीमने आपल्या काही भारतीय संपर्कांची माहितीही एटीएसला दिली आहे. त्यावरून पुढील तपास सुरू आहे.


इतर महत्वाची बातमी:


RBI Guidlines : कर्जवसुलीसाठी बँका तुम्हाला धमकावतात? धमक्या देऊ नका... वसुली एजंट्ससाठी RBI ची नवी नियमावली
अखेर कष्टाचे फळ मिलाले, 20 रुपयांसाठी 22 वर्षे लढा, रेल्वेला द्यावी लागणार भरपाई