सूरतः गुजरातच्या सूरतमध्ये असलेल्या ओएनजीसी गॅस प्लॅंटमध्ये भीषण आग लागली आहे. ही आग फार भयानक असून अजूनही स्फोटाचे आवाज येत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही.
आजूबाजूच्या गावातील लोकांनी सांगितलं की, ONGC गॅस प्लॅंट स्फोट इतका भयानक होता की, स्फोटाच्या वेळी घराचे दारे खिडक्या भूकंप झाल्यासारखं हादरत होत्या. सूरतचे जिल्हाधिकारी धवल पटेल यांनी ABP न्यूजशी बोलताना सांगितलं की, 'आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्थानिक तहसीलदार आणि प्रशासनातील अन्य अधिकारी घटनास्थळावर हजर आहेत आणि यावर लक्ष ठेवून आहेत.'
धवल पटेल यांनी सांगितलं की, आतापर्यंत या घटनेत जीवितहानी झाल्याचं समोर आलेलं नाही. तसंच या स्फोटाचं कारण देखील समोर आलेलं नाही. धवल पटेल यांनी सांगितलं की ONGC गॅस प्लॅंट मध्ये लागलेली आग ही सध्या ऑन साईट इमरजेंसी अशा स्थितीत आहे. त्यांनी सांगितलं आहे की, ऑफ साइट इमरजेंसी नसल्यानं आजूबाजूच्या लोकांनी घाबरण्याची गरज नाही.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, ओएनजीसीमध्ये झालेले हे स्फोट इतके भीषण होते की दहा किलोमीटरपर्यंत ते ऐकू आले. या ठिकाणी पहाटे चार पासूनच आग विझवण्याचे काम अग्निशामन दलाच्या जवानांकडून केलं जात होतं.
धवल पटेल यांच्या माहितीनुसार तीन वाजण्याच्या सुमारास प्रकल्पाच्या टर्मिनल्समध्ये लागोपाठ तीन मोठे स्फोट झाले. त्यानंतर येथील टर्मिनल दोनला आग लागली. सध्या या प्रकल्पामध्ये साठवून ठेवण्यात आलेला नैसर्गिक गॅसचा साठा डिप्रेशराइज करण्याचे काम सुरु आहे असं पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.