नवी दिल्ली : चित्रपटगृहांमध्ये सिनेमा सुरु होण्याआधी राष्ट्रगीत लावणं आता अनिवार्य नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने 30 नोव्हेंबर 2016 रोजी दिलेला आपलाच निर्णय बदलला आहे.
सिनेमाआधी राष्ट्रगीत अनिवार्य करु नये अशी विनंती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. या मुद्द्यावर आंतरमंत्रालयीन समिती स्थापन केली असून ती सहा महिन्यात आपल्या सूचना देईल, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं.
यावर निर्णय देताना, थिएटरमध्ये चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत बंधनकारक नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.
पूर्वीसारखीच परिस्थिती कायम ठेवावी
- केंद्र सरकारने राष्ट्रगीत अनिवार्य करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात प्रतीज्ञापत्र दाखल केलं होतं. या प्रकरणात कोर्टाने आपल्या 30 नोव्हेंबर 2016 च्या आदेशापूर्वीची परिस्थिती कायम ठेवावी, अशी विनंती सरकारने केली होती.
- 23 ऑक्टोबर 2017 रोजी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सांगितलं होतं की, "चित्रपटगृह आणि इतर ठिकाणी राष्ट्रगीत अनिवार्य करायचं की नाही हे सरकारने ठरवावं. यासंदर्भात जारी झालेलं कोणतंही परिपत्रक कोर्टाच्या या अंतरिम आदेशामुळे प्रभावित होऊ नये."
काय आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश?
- सुप्रीम कोर्टने 30 नोव्हेंबर 2016 रोजी आदेश दिला होता की, देशातील सर्व थिएटरमध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावणं अनिवार्य आहे.
- यावेळी स्क्रीनवर तिरंगा दिसायला हवा. तसंच राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ चित्रपटगृहांमध्ये उपस्थित सगळ्यांना उभं राहणं बंधनकारक आहे.
- राष्ट्रगीत सुरु असताना सिनेमाहॉलचे गेट बंद केले जावेत, जेणेकरुन यावेळी अडथळे येणार नाही.
- राष्ट्रगीत अशा कोणत्याही ठिकाणी छापू किंवा चिटकवू नये, ज्यामुळे त्याचा अपमान होई, असंही कोर्टाने स्पष्ट केलं होतं. राष्ट्रगीमधून व्यायसायिक लाभ घेऊ नये.
- राष्ट्रगीत अर्ध-अपूर्ण लावलं आणि ऐकवलं जाऊ नये. ते पूर्णच लावलं पाहिजे, असंही सुप्रीम कोर्टाने आदेशाने म्हटलं आहे.
केंद्र सरकारने भूमिका बदलण्याचं कारण काय?
राष्ट्रगीत अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर अनेक घटना समोर आल्या होत्या, ज्यात काही कारणाने राष्ट्रगीताला उभं न राहिल्याने जमावाने एखाद्याला मारहाण केली होती. शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती राष्ट्रगीताच्यावेळी उभं न राहिल्याने जमावाने त्याला मारल्याचाही प्रकारही घडला होता. तसंच कुटुंबाला चित्रपटगृहातून बाहेर काढलं होतं.
अशा घटना होऊ नये, यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या जाणार असून, यासाठी मुदत द्यावी, अशी विनंती गृहमंत्रालयाने सुप्रीम कोर्टात केली आहे. म्हणूनच थिएटरमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यासंदर्भात केंद्र सरकारने आपली भूमिका काहीशी बदलली आहे.
चित्रपटगृहांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य नाही!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Jan 2018 01:56 PM (IST)
सुप्रीम कोर्टने 30 नोव्हेंबर 2016 रोजी आदेश दिला होता की, देशातील सर्व थिएटरमध्ये सिनेमा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावणं अनिवार्य आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -