Sunanda Pushkar Case: सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयानं काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.  सुनंदा पुष्कर यांच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानी आरोपपत्र दाखल केलं होतं.

  शशी थरुर यांनी पत्नीशी क्रूर वर्तन केल्याचा आणि सुनंदा यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. तीन हजार पानांच्या आरोपपत्रात केवळ थरुर यांच्यावरच ठपका ठेवण्यात आला होता.



सुनंदा पुष्कर मृत्यू : थरुरांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका







 




'पत्नी डिप्रेशनमध्ये असताना पती म्हणून शशी थरुर यांनी काहीच केलं नाही. सुनंदा यांच्या मृत्यूच्या काही काळ आधीही थरुर यांनी पत्नीचे फोन कट केले किंवा उचलले नाहीत. त्यांच्या शरीरावरील जखमा गंभीर नसल्या तरी दाम्पत्यामध्ये भांडणं होत असल्याचं यातून समोर येतं' असं निरीक्षण चौकशी पथकाने आरोपपत्रात नोंदवलं होतं. त्या काहीही खात नव्हत्या, रुमबाहेर पडत नव्हत्या, असं समोर आल्याचा उल्लेख चार्जशीटमध्ये होता.


शशी थरुर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप सुनंदा पुष्कर यांनी सोशल मीडियावरुन केला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता. सुनंदा पुष्कर या 17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलच्या 345 क्रमांकाच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्या होत्या. सुनंदा यांनी 2010 मध्ये शशी थरुर यांच्यासोबत लग्न केलं होतं. हा त्यांचा तिसरा विवाह होता.