Punjab Next CM : कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून आज पुढील मुख्यमंत्र्याची निवडू होऊ शकते. अमरिंदर सिंग यांचा नवज्योत सिंग यांच्यासोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. अमरिंदर सिंग यांनी शनिवारी आपला अपमान झाल्याचे सांगत राजीनामा दिला. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यानंतर पंजाबचा मुख्यमंत्री कोण? यावर चर्चा सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सुखजिंदर सिंह रंधावा हे पंजाबचे पुढील मुख्यमंत्री असू शकतात. 


सुखजिंदर सिंह रंधावा पंजाबचे मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ देखील मागितली आहे. सुखजिंदर रंधावा यांच्या घरी आमदारांची रेलचेल वाढली आहे. मात्र हायकमांडच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. ते जे निर्णय घेतील त्यानंतर बोलणे योग्य राहिल, असं त्यांनी म्हटलं.


62 वर्षीय सुखजिंदर रंधावा हे तीन वेळा आमदार असून अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात कारागृह आणि सहकार मंत्री होते. गुरदासपूरचे रहिवासी सुखजिंदर रंधावा हे पंजाब काँग्रेसचे उपाध्यक्षही राहिले आहेत. त्यांचे वडील संतोख सिंह दोन वेळा पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष होते.






काँग्रेसचे आमदार प्रीतम कोटभाई यांनी म्हटलं की, सर्व आमदारांनी सुखजिंदर रंधावा यांना  मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस हायकमांडसमोर नामांकित केले आहे आणि ते मुख्यमंत्री होतील.


मुख्यमंत्री पदासाठी कुणाची नावं चर्चेत 


पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड, प्रताप सिंह बाजवा आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू रवनीत सिंग बिट्टू हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशा फॉर्म्युल्याचीही चर्चा सुरु असल्याची  माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे.