Sudha Murthy Says Husband Narayana Murthy Is Corporate Gandhi : नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे संस्थापक (Infosys Co-Founder) नारायण मूर्ती  (Narayan Murthy) यांचं एक वक्तव्य चर्चेत आलेलं. नारायण मूर्ती यांनी एका मुलाखतीत बोलताना देशातील तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिलेला. नारायण मूर्तींच्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. काहींनी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं, तर काहींनी त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. अशातच आता नारायण मूर्ती यांच्या आठवड्यातून 70 तास काम करण्याच्या वक्तव्याचं समर्थनार्थ त्यांच्या पती सुधा मूर्ती (Sudha Murthy) उभ्या राहिल्या आहेत. आजही मी 70 तासांपेक्षा जास्त काम करते, असं म्हणत सुधा मूर्तींनी नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. तसेच, कुटुंबासोबत क्‍वांटिटी टाईमपेक्षा, क्वॉलिटी टाईम घालवणं अत्यंत गरजेचं आहे, असं नारायण मूर्ती म्हणाले. 


इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती (Narayan-Sudha Murthy Relationship) यांच्यातील नात्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर सुधा मूर्ती यांनी एक उदाहरण दिलं, त्या म्हणाल्या की, "हे कॉर्पोरेटचे गांधी आहेत. पण मी, कस्तुरबा नाहीय." पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "1974 मध्ये जेव्हापासून नारायण मूर्ती त्यांना पहिल्यांदा भेटले, तेव्हापासून त्या त्यांना मूर्ती म्हणूनच हाक मारतात."


मीसुद्धा करते आठवड्यातून 70 तासांहून अधिक काम : सुधा मूर्ती 


लेखिका सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्तींच्या वक्तव्याचं समर्थन केलं. त्या म्हणाल्या की, मी या वयातही आठवड्यात 70 तासांहून अधिक तास काम करते. त्या म्हणाल्या की, "तुम्हाला तुमच्या कामाचा आनंद घेता आला पाहिजे. कामाप्रति प्रेम आणि आवड असणं गरजेचं आहे. तसेच, सुट्टीच्या दिवशीही काम केलं पाहिजे."


क्‍वांटिटी टाईमपेक्षा क्‍वालिटी टाईम महत्‍वाचा : नारायण मूर्ती 


ते पुढे म्हणाले की, नारायण मूर्ती यांचा कठोर परिश्रमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून येतो, कारण ते नेहमीच पुरेसे प्रयत्न करण्याच्या तत्त्वावर ठाम राहिले आहेत. दरम्यान, नारायण मूर्ती म्हणाले की, कंपनी स्टेबल करताना त्यांनी आठवड्यातून 85 ते 90 तास काम केलं. यानंतरही त्यांनी कुटुंबासोबत वेळ घालवला. ते म्हणाले की, क्‍वांटिटी टाईमपेक्षा क्‍वालिटी टाईम महत्‍वाचा असतो. 


दीड-दोन तास अत्यंत आरामाचे 


ते म्हणाले की, मी सकाळी 6 वाजता ऑफिससाठी घरात निघायचो आणि रात्री जवळपास 9.15 पर्यंत घरी परतायचो. मुलं गेटवर असायची. सुधा, मुलं आणि माझे सासरे गाडीत बसायचे आणि आम्हाला जे काही खाण्याची इच्छा असायची ते खाण्यासाठी निघायचो. त्यावेळी आम्ही खूप मस्ती करायचो. ते दीड-दोन तास आयुष्यातील सर्वात आरामाचे तास होते, असं मला वाटतं. त्यांनी त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सांगितलं होतं की, जेव्हा जेव्हा त्यांच्यासमोर कोणत्याही अडचणी येतील, तेव्हा ते नेहमी त्यांच्यासाठी वेळ काढतील.


तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं : नारायण मूर्ती 


इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी देशाचा जीडीपी वाढवण्यासाठी तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात चर्चंना उधाण आलं होतं. यावर अनेक अब्जाधीशांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. काहींनी मूर्ती यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं तर काहींनी त्यांना स्‍मार्ट वर्क करण्यास सांगितलं होतं.