नवी दिल्ली : खासदारांना यापुढे संसद भवन संकुलाच्या कॅन्टीनमध्ये अनुदानित जेवण मिळणार नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. ओम बिर्ला यांनी म्हटलं की, खासदारांना आणि इतरांना संसदेतील कॅन्टीनच्या जेवणावर दिले जाणारं अनुदान बंद करण्यात आलं आहे.
आयटीडीसी (भारतीय पर्यटन विकास महामंडळ) आता संसदेची कॅन्टीन चालवणार आहे. याआधी ही जबाबदारी उत्तर रेल्वेकडे होती. याआधी संसदेच्या कॅन्टीनमध्ये जेवणांची प्लेट अवघ्या 35 रुपयांना मिळत होती. अनुदान रद्द केल्याने लोकसभा सचिवालयाची दरवर्षी 8 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ओम बिर्ला पुढे म्हणाले की , 2 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे. लोकसभेचं कामकाज संध्याकाळी 4 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंत चालणार आहे.
संसद अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व खासदारांना कोविड -19 ची चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. खासदार निवासस्थानाजवळ त्यांच्या आरटी-पीसीआरची कोविड 19 चाचणी घेण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. 27-28 जानेवारी रोजी संसद आवारात आरटी-पीसीआर तपासणी केली जाईल. खासदारांच्या कुटुंबीय, कर्मचार्यांची आरटी-पीसीआर तपासणीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.