नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाची वेळ आली आहे, असं सूचक वक्तव्य पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी चंदीगडमध्ये एका चॅनलशी बोलताना हा दावा केला आहे. मात्र सोनियांच्या या विधानामुळे काँग्रेस पक्षाचं नेतृत्त्व राहुल गांधी यांच्याकडे सोपवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
पक्षाच्या सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष बनण्यास तयार आहे. याबाबत काही आठवड्यातच निर्णय घेतला जाईल. राहुल धुरा सांभाळण्याआधी पक्षाच्या सरचिटणीस, सचिव, विभागप्रमुख आणि प्रदेशाध्यक्ष बदलण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. राहुल गांधी या सर्व नावांच्या यादीवर शिक्कामोर्तब करतील.
काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर राहुल गांधी चिंतन शिबीर घेणार आहेत. या शिबीरात अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या कारणांवर चर्चा केली जाणार आहे. तसंच पक्षाचं ध्येयधोरणही ठरवलं जाईल.
काँग्रेसकडून वृत्ताचा इन्कार
मात्र या वृत्तावर काँग्रेसकडून परिपत्रक जारी करुन राहुल गांधी यांना अध्यक्ष बनवण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
यामुळे नेतृत्त्व बदलाची मागणी
नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काँग्रेससाठी निराशाजनक होते. फक्त पुद्दुचेरीतच काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यास यश आलं. आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला.
यानंतर दिग्विजय सिंह, कमलनाथ यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाला नेतृत्त्व बदलाची गरज असल्याचं सुचवलं होतं. दिग्विजय सिंह म्हणाले होते की, " मिसेस गांधी 69 वर्षांच्या आहेत, त्यानंतर एप्रिल 1998 पासून काँग्रेस अध्यक्षा आहेत. मिस्टर गांधी 45 वर्षांचे आहेत आणि पक्षातील दोन नंबरचे नेते आहेत.
काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्त्वात 2014 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. पक्षाला केवळ 44 जागा मिळाल्या होत्या.
पंजाब, उत्तर प्रदेशात पुढील वर्षी निवडणुका
कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, "हा सोनिया गांधीचा निर्णय आहे. आम्हाला त्यांच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा.
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून अमरिंदर सिंह काँग्रेसचे प्रचारप्रमुख आहेत. राज्यात सध्या अकाली दल आणि भाजपचं आघाडी सरकार आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षही नशीब आजमावणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपने सर्वांना आश्चर्यचकित करत पंजाबमध्ये 4 जागा जिंकल्या होत्या.
याशिवाय उत्तर प्रदेशातही पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहेत.