नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या देशाच्या पंतप्रधान होण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. देशात 2004 मध्ये जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले, तेव्हा सोनिया गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या पाहिजे होत्या. तसेच सोनिया गांधी यांच्यावर परदेशी असण्यावरुन होत असलेल्या टीकेला बालिश असल्याचेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे. त्या भारतीय नागरिक आणि लोकसभेच्या सदस्य असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की जर कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात, तर सोनिया गांधी भारताच्या पंतप्रधान का बनू शकत नाहीत.


रामदास आठवले यांनी शनिवारी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जेव्हा यूपीएला बहुमत मिळाले, तेव्हा मी सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळीही माझे मत होते की त्यांचे परदेशी वंशाचे असणे हा मुद्दा नाही. जर कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात, तर सोनिया गांधी देखील देशाच्या पंतप्रधान बनू शकतात. सोनिया गांधी भारतीय नागरिक असून त्या देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पत्नी आणि लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदार आहेत. मग त्या पंतप्रधान नक्की बनू शकतात.






डॉ. मनमोहन सिंह यांच्याऐवजी शरद पवारांना पंतप्रधान करायला हवे होते


रामदास आठवले यांनी पुढे असंही म्हटलं की, त्यावेळी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पद स्वीकारलं नाही. त्यावेळी शरद पवारांना पंतप्रधान बनवायला हवे होते. जे त्यावेळी यूपीएतील वरिष्ठ नेते देखील होते. जर 2004 जर मनमोहन सिंह यांच्या जागी शरद पवारांना पंतप्रधान केले असते तर काँग्रेस पक्षाची स्थिती आज इतकी वाईट झाली नसती.


माझा पक्ष जातीय जनगणनेच्या बाजूने 


आमचा पक्ष जातीच्या जनगणनेच्या बाजूने असल्याचे सांगितले रामदास आठवले यांनी सांगितलं. सरकारने जातीच्या आधारावर जनगणना करण्याचा विचार करावा असे पक्षाचे मत आहे. अलीकडे सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की मागासवर्गीयांची जात-आधारित जनगणना "प्रशासकीयदृष्ट्या कठीण आहे आणि जनगणनेच्या कक्षेतून अशी माहिती वगळणे हा धोरणात्मक निर्णय आहे.