पानिपत : हरियाणातील पानिपतमध्ये 22 वर्षीय गायिकेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मयत तरुणीने काही महिन्यांपूर्वी आपल्या मेहुण्यावर बलात्काराचे आरोप केले होते, तर आईच्या हत्याप्रकरणाची ती साक्षीदार होती.


हर्षिता दहिया पानिपतमधील चामरा गावात परफॉर्म करुन घरी येत होती. दुपारी चार वाजताच्या सुमारास दोघांनी तिची गाडी अडवली. हर्षितासोबत असलेल्या तिघांना मारेकऱ्यांनी कारमधून खाली उतरवलं आणि तिच्यावर गोळीबार केला. हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही.

हर्षिता दिल्लीतील नरेला भागात राहायची. तिने मेहुण्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी तिचा मेहुणा तुरुंगातच आहे. काही महिन्यांपूर्वी हर्षिताच्या आईची दिल्लीत हत्या करण्यात आली होती. या घटनेचीही ती साक्षीदार होती.

पूर्ववैमनस्यातून हर्षिताची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, मात्र अधिक तपास सुरु आहे. तिचा मृतदेह ऑटोप्सीसाठी पाठवण्यात आला आहे.