Sikkim Flood Update : सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुरात आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 1200 घरे वाहून गेली. तर 15 लष्करी जवानांसह 103 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे 25 हजार लोक बाधित झाले आहेत. अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगारा आणि चिखलात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी शोध आणि बचाव पथके कार्यरत आहेत.
सिक्किममध्ये 'जलप्रलय', पुरामुळे 25000 लोक बाधित
मुख्यमंत्री पीएस तमांग यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सिक्कीममध्ये आतापर्यंत 19 मृतदेह सापडले आहेत. याशिवाय पुरामुळे अनेक जण वाहून गेल्याने उत्तर बंगाल भागात जिल्ह्यांमध्ये 22 मृतदेह सापडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या बचावलेल्या 26 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर सुमारे 1500 लोक मदत शिबिरात आहेत. पुरामुळे 25000 लोक बाधित झाले आहेत.
लष्कराच्या 15 जवानांचा शोध सुरू
सिक्कीममधील पुराचा फटका भारतीय लष्कराच्या जवानांनाही बसला आहे. तीस्ता बॅरेजच्या खालच्या भागात बेपत्ता झालेल्या सैन्य दलातील सात जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 15 सैनिकांचा अद्याप शोध सुरू आहे. सिंगतामजवळील बुरडांग येथे लष्कराकडून बचावकार्य राबवलं जात आहेत. तिरंगा माउंटन रेस्क्यू (TMR), लष्कराशी संबंधित संस्था, श्वान पथक आणि विशेष रडारची अतिरिक्त टीम शोध मोहिमेत मदत करण्यात गुंतले आहेत.
बाधित भागात मदत साहित्य पोहोचवण्याचं काम सुरु
संरक्षण आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी बचावकार्यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. राज्याच्या यंत्रणेशीही संपर्क सुरू आहे. पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या रस्त्यांची डागडुजी करुन रस्ते लवकरात लवकर खुले करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. लष्कर आणि इतर सुरक्षा दलांच्या माध्यमातून बाधित भागात मदत साहित्य पोहोचवलं जात आहे.
22 लष्करी जवानांसह 103 लोक बेपत्ता
सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या 19 वर पोहोचली आहे. सिक्कीममधील या पुरात 22 लष्करी जवानांसह 103 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. बेपत्ता झालेल्या 23 जवानांपैकी फक्त एक सैनिकच सापडला आहे. बेपत्ता लोकांच्या शोधासाठी लष्कर आणि एनडीआरएफची टीम वाढवण्यात आली आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. गुवाहाटी आणि पाटणा येथून आणखी टीम पाठवण्यात येत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तवांग यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिलं आहे.