मुंबई : नूर मोहम्मद... जैश-ए-मोहम्मदचा कमांडर...आणि उंची अवघी 3 फूट! आपल्या उंचीच्या बळावर भारतीय लष्कराला कायम गुंगारा देणाऱ्या सर्वात कमी उंचीच्या दहशतवाद्याचा अखेर खात्मा झाला. पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत नूर मोहम्मदला कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आलं.


उंचीनं कमी असला तरी दहशतवादी कंपूमध्ये त्याची दहशत अचाट होती. ऑक्टोबरमध्ये श्रीनगर विमानतळावरील हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता. 2001 मधल्या संसदेवरच्या हल्ल्यातील सूत्रधारांपैकी तो एक होता.

जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात असल्यामुळे 2003 मध्ये त्याला अटक झाली. पोटा कायद्याअंतर्गत 2011 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, पण 2015 मध्ये पॅरोलवर सुटलेला नूर पुन्हा फरार झाला.

जम्मू-काश्मीरच्या बांधकाम मंत्रालयावरच्या हल्ल्यातही नूर सामील होता. तीन फूट उंचीमुळे लपणं सहज शक्य असल्यामुळे नूरची निवड करण्यात आली. सीमेपलीकडून जैश-ए-मोहम्मदसाठी पैसे मिळवण्याची जबाबदारी नूरवर होती. हल्ल्याचं ठिकाण, हल्ल्याचा कट, आणि हल्ल्यानंतरचे पलायन याचं तो प्लॅनिंग करायचा. नूरच्या खात्म्यानं काश्मीरमधल्या सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे.