नवी दिल्ली : विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात शिवसेनाचा पराभव म्हणजे विश्वासाला तडा जाणारी गोष्ट असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (arvind sawant)  यांनी केले आहे. आमची जी मतं आहेत ती शंभर टक्के पडायला हवी होती. या पराभवाचा दोष कोणा एकावर देऊन उपयोग होणार नसल्याचे खासदार सावंत यावेळी म्हणाले. अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या वसंत खंडेलवाल (vasant khandelwal)  यांचा 109 मतांनी विजयी झाला आहे. त्यांनी शिवसेनेच्या तब्बल तीन टर्मपासून आमदार असलेल्या गोपीकिशन बाजोरियांचा (Gopikishan Bajoria) पराभव केलाय. खंडेलवालांनी बाजोरियांचा 443 विरूद्ध 334 मतांनी पराभव केला आहे.


आमच्या तीन पक्षांची मते मिळून पराभव झाला असता तर कदाचित इतकं वाईट वाटलं नसतं. या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल तिनही पक्षांच्या प्रमुखांनी घ्यायला हवी, असेही अरविंद सावंत म्हणाले. शिवसेनची मते कमी होती, मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची देखील मते होती. तीन पक्षांची शंभर टक्के मत न मिळाल्यानं शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे ते म्हणाले. या पराभवात शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस आहे का? असा सावंत यांना प्रश्न केला असता अंतर्गत धुसफूस नसेलच असं मी म्हणणार नाही. पण तेवढ्यामुळे बाजोरियांचा पराभव झाला असे मी म्हणणार नाही. 



अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघावरील शिवसेनेच्या तब्बल 24 वर्षांच्या सत्तेला भाजपनं सुरूंग लावलाय. 1997 पासून या मतदारसंघावर शिवसेनेचा ताबा होता. 1997 ते 2021 पर्यंत शिवसेनेनं या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर एकहाती वर्चस्व गाजवलं होतं. यातील सलग तीन टर्म 18 वर्ष गोपीकिशन बाजोरिया येथून विजयी झाले होते. मात्र, यावेळी भाजपच्या वसंत खंडेलवालांनी बाजी मारलीय. या निवडणुकीत भाजपच्या वसंत खंडेलवाल यांना 443 मतं मिळाली आहेत. तर गोपीकिशन बाजोरिया यांना 334 मतं मिळालीत. तर 31 मतं अवैध ठरली आहेत. गोपीकिशन बाजोरियांचा पराभव करीत खंडेलवाल 'जायंट किलर' ठरले आहेत. हा विजय कार्यकर्ते आणि पक्षाला समर्पित करीत असल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी दिली आहे.



अकोल्यातील पक्षाच्या पराभवामुळे शिवसेनेत मोठं घमासान होण्याची शक्यता आहे. अकोल्यातील शिवसेनेच्या पराभवाचं खापर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्यावर फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अकोल्याच्या निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेनं  खासदार अरविंद सावंत यांच्यावर सोपवली होती. अरविंद सावंत याआधी अकोल्याचे सेना संपर्कप्रमुख होते. अकोल्यात शिवसेनेत अरविंद सावंत आणि बाजोरियांचे पक्षांतर्गत गट होते. दोन्ही गटांत जिल्ह्यात वर्चस्वाची लढाई रंगल्याचं अनेकदा समोर आलं होतं. अकोल्यातील बाळापूरचे सेना आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुख हे बाजोरियांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक आहेत. पराभवाच्या संभाव्य अहवालात पक्षाच्या पराभवाची कारणे समोर येण्याची शक्यता आहे. पराभवावर प्रतिक्रिया देतांना बाजोरिया यांनी "आपण मंत्री होऊ अशी काहींना भिती होती", असं म्हणत केलं पक्षांतर्गत दगाफटक्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. तर या पराभवाचा दोष कोणा एकावर देऊन उपयोग होणार नसून, हा पराभव म्हणजे विश्वासाला तडा जाणारी गोष्ट असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.