Shehbaz Sharif SCO Photo Edit : किर्गिझस्तानची राजधानी बिश्केक येथे आयोजित 26 व्या शंघाई सहकार्य संघटना (SCO) शिखर परिषदेदरम्यान पाकिस्तानच्या नाकर्तेपणाचे आणखी एक उदाहरण जगासमोर आले आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या कार्यालयाने SCO परिषदेचा एक क्रॉप केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये जगातील अनेक प्रमुख नेत्यांना क्रॉप करून हटवण्यात आले होते, जेणेकरून शहबाज शरीफ हे फ्रेमच्या मध्यभागी दिसू शकतील.

Continues below advertisement

या एडिटेड फोटोमधून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांना थेट क्रॉप करून गायब करण्यात आले होते. मात्र, या बालिश प्रकारामुळे जगभरातून थट्टा उडाल्यानंतर आणि सोशल मीडियावर तुफान ट्रोलिंग झाल्यानंतर शेवटी शहबाज शरीफ यांनी पुन्हा सर्व जागतिक नेत्यांचा मूळ फोटो स्वतः शेअर करत यू-टर्न घेतला.

Original SCO Family Photo : मूळ फोटोत कोण-कोण होते?

बिश्केक येथील 26 व्या एससीओ शिखर परिषदेच्या सत्रापूर्वी काढण्यात आलेल्या मूळ फोटोमध्ये एससीओचे सर्व सदस्य देश आणि वरिष्ठ अधिकारी एकत्र उभे होते. यामध्ये एससीओ सरचिटणीस नुरलान येरमेकबायेव, बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान, कझाकस्तानचे अध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, किर्गिझ अध्यक्ष सादिर जापारोव, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, तजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमाली रहमोन, उझबेकिस्तानचे अध्यक्ष शवकत मिर्झियोयेव आणि एससीओ प्रादेशिक दहशतवादविरोधी रचनेचे प्रमुख उलरबेक शारशेव उपस्थित होते.

मात्र, पाकिस्तानने 'सिलेक्टिव्ह फ्रेमिंग'चा वापर करत शहबाज शरीफ यांना फक्त काही ठराविक नेत्यांसोबत सेंटरमध्ये दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाल्यानंतर पाकिस्तानला आपली चूक सुधारावी लागली.

PM Modi Speech At SCO : दहशतवादावरून भारताने दाखवला आरसा

दुसरीकडे, एससीओच्या मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (1 सप्टेंबर 2026) दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला उघडे पाडले. जे देश सरकारी धोरण म्हणून दहशतवादाचा वापर करतात, अशा देशांचा एससीओने ठामपणे सामना केला पाहिजे, असे स्पष्ट वक्तव्य पीएम मोदी यांनी केले. तसेच दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा आणि दहशतवाद्यांच्या भरतीविरोधात लढताना दुटप्पी निकष लावणे थांबवले पाहिजे, असेही ते म्हणाले.

India Opposes BRI Project : बीआयआर प्रकल्पावर भारताचा आक्षेप

पंतप्रधान मोदींनी चीनच्या 'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह' (BRI) प्रकल्पाचा उल्लेख करत स्पष्ट केले की, कोणत्याही कनेक्टिव्हिटी प्रकल्पाने सर्व देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे, कारण हीच एससीओ चार्टरची मूल भावना आहे. भारताने बीआरआय प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला आहे, कारण या प्रकल्पाचा काही भाग पाकव्याप्त काश्मीरमधून (PoK) जातो.

ही बातमी वाचा: