Shehbaz Sharif on India Pakistan Conflicts: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने 1960 सालचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला. मात्र, त्यानंतर काही आठवड्यांतच पाकिस्तानने या करारावर भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी देखील भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार असल्याचं विधान केलं आहे. 

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुडघे टेकले आहेत. याचदरम्यान पाकिस्तानचे पतंप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, पाकिस्तान शांततेसाठी भारतासोबत चर्चा करण्यास तयार आहे, असं शाहबाज शरीफ म्हणाले. तर जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी आणि दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही, असं भारताने ठणकावले आहे. 

गेल्या 48 तासांत सहा दशतवाद्यांना कंठस्नान-

ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर भारतानं आपला मोर्चा जम्मू काश्मीर भागातील स्थानिक दहशतवाद्यांकडे वळवला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं 14 दहशतवाद्यांची एक यादी जाहीर केली होती. गेल्या 48 तासात या यादीतील सहा दशतवाद्यांना भारतीय सैन्यानं कंठस्नान घातलंय. तर उरलेल्या 8 जणांचा शोध सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी ऑपरेशन केलरमध्ये तीन दहशतवादी ठार झाले होते. तर गुरुवारी सकाळी राबवलेल्या ऑपरेशन नादरमध्ये आणखी तीन दहशतवादी मारले गेले. 

भारतीय सेनादलाने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं-

पाश्चात्य माध्यमं भारताबाबत किती आकस ठेवून आहेत याचा प्रत्यय ऑपरेशन सिंदूरमुळे पुन्हा आला. भारतीय सेनादलाने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. मात्र चीनी टुलकिट वापरुन परदेशी मीडियाने गलितगात्र पाकिस्तानच्या खोट्या विजयाच्या गाथा लिहून टाकल्या. भारताने  शांतपणे पाकिस्तानात घातलेल्या तांडवाचे अति उच्च दर्जाचे सॅटेलाईट फोटो सादर केले. हा सूर्य हा जयद्रथ म्हणजे काय हे जगाला कळले आणि पाश्चात्य माध्यमांची भाषाच बदलली. हे कमी होतं की काय डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीचं श्रेय घेण्यासाठी आटापिटा केला. 

चीनच्या कुरापतींवरही भारताची नजर-

भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरू असताना दुसरीकडे चीनच्या कुरापतींवरही भारताची नजर होती. आणि म्हणूनच युद्धजन्य परिस्थितीतही भारतीय सैन्यदलाची एक तुकडी पूर्वेकडे युद्धसरावात व्यस्त होती. पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत भारताच्या तिन्ही सैन्य दलानं हा संयुक्त युद्धाभ्यास केला. याचं नाव होतं 'ऑपरेशन तीस्ता प्रहार'.

संबंधित बातमी:

भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओमधील चर्चेचा तपशील समोर, एका गोष्टीवर दोघांची सहमती, जाणून घ्या काय ठरलं?