मुंबई: जगभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट BF.7 ने धुमाकूळ घातला असून त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतात आता खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच वेळी कोरोनाचा हा प्रसार रोखण्यासाठी कोवॅक्स लसीच्या बूस्टर डोसच्या (Covid-19 Vaccine Covovax) वापराला परवानगी देण्यात यावी अशी मागणी सिरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute of India) केंद्र सरकारकडे केली आहे. ज्या लोकांनी या आधी कोविशिल्डच्या दोन लसीची मात्रा घेतली आहे अशा लोकांना हा बूस्टर डोस देण्यासाठी मंजुरी देण्यात यावी अशी  मागणी करमय्ता आली आहे. 


सीरम इन्स्टिट्यूटने कोवॅक्सच्या एका लसीच्या बूस्टर डोसला (Covid-19 Vaccine Covovax AsBooster Shot)बाजारात आणण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी 17 ऑक्टोबर रोजी औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. 


डीसीजीआयने (DCGI) जून महिन्यात सात ते 11 वयोगटातील मुलांसाठी कोवॅक्सच्या आपातकालीन वापराला मंजुरी दिली होती. त्याचप्रकारे डीसीजीआयने प्रौढ लोकांच्या कोवॅक्स लसीच्या वापराला 28 डिसेंबर 2021 रोजी तर 12 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीच्या वापराला 9 मार्च रोजी मंजुरी दिली होती. 


देशातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात 


जगभरात कोरोनाचा प्रभाव दिसत आहे. कोरोनाने (Coronavirus) प्रत्येक देशाला प्रभावित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांमध्ये कोरोनाचे  (Coronavirus) रुग्ण वाढत आहेत. मात्र भारतात मात्र सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. भारतात दररोज सरासरी 153 नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. तर संपूर्ण जगात दररोज 5 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. जपान, चीन, दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स आणि इटली यांसारख्या देशांमध्ये कोरोनाचे  (Coronavirus) मृत्यू आणि नवीन रुग्ण आढळून येत आहेत.


भारतात खबरदारीच्या उपाययोजना 


सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क घालावेत, सोशल डिस्टन्सिंग नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत.


Covid 19 Updates: राज्यांनी अलर्ट राहावं, मोदींची सूचना 


सर्व राज्यांनी त्यांच्या आरोग्य व्यवस्थेचे ऑडिट करत रुग्णालयं सज्ज ठेवावीत अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधींच्या लसीकरणावर भर द्या असंही ते म्हणाले. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणीही मास्कचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं. 


आजच्या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. देशात सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येची वाढ कमी असली तरीही जगभरात मात्र ही संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.