Delhi RTO Number Controversy : जरा विचार करा, तुमच्या कारचा अथवा दुचाकीवरील क्रमांक हा तुमच्यासाठी लाज आणणारा, मनस्ताप देणारा ठरत असेल तर तुम्ही काय करणार? दिल्लीतील एका विद्यार्थीनीवर अशी वेळ आली आहे. तिच्या दुचाकीवर असलेल्या क्रमांकामुळे तिला ट्रोलिंग, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
प्रीती (बदललेले नाव) ही दिल्लीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी मुलगी आहे. मागील महिन्यात तिचा वाढदिवस होता. वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून तिने आपल्या वडिलांकडे दुचाकीची मागणी केली होती. वडिलांनी मुलीची इच्छा पूर्ण केली आणि एक दुचाकी बुक केली. इथपर्यंत सर्व ठीक होते. मात्र, या दुचाकीला मिळालेल्या क्रमांकामुळे प्रीती आणि तिच्या कुटुंबीयांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. प्रीतीला परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या क्रमांकामध्ये S.E.X.ही अक्षरे होती.
दुचाकीच्या नंबरप्लेटवर असलेले ही अक्षरे कुटुंबाच्या मानसिक त्रासाचे कारण होऊ शकते असा अंदाज प्रीतीच्या भावालादेखील आला नाही. गाडीच्या नंबरप्लेटवर असलेली ही अक्षरे पाहून लोकांची शेरेबाजी सुरू झाली. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांनी दुचाकी चालवत असलेल्या प्रीतीच्या भावावर शेरेबाजी केली.
कुटुंबाच्या अडचणीत वाढ
प्रीतीच्या भावाने घरी आल्यानंतर ही घटना कुटुंबीयांना सांगितली. भावावर ओढावलेल्या प्रसंगामुळे प्रीती चांगलीच धास्तावली आहे. तिने दुचाकीचा क्रमांक बदलवून घेण्याची मागणी वडिलांकडे केली. मात्र, आता नियमांमुळे वाहन क्रमांक बदलता येणार नसल्याचे दिल्लीती एका परिवहन अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंत या सिरीजच्या शेकडो वाहनांना क्रमांक देण्यात आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दिल्ली परिवहन आयुक्त के.के. दहिया यांनी सांगितले की, एकदा वाहनाला क्रमांक दिल्यानंतर त्याला बदलण्याची कोणतीही तरतूद नाही. वाहनांना क्रमांक देण्याची प्रक्रिया एका ठरलेल्या पॅटर्ननुसार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सांकेतिक क्रमांकामुळे गोंधळ
केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्लीत वाहन क्रमांकासाठी एक वेगळी पद्धत आहे. उदाहरणार्थ DL 9 CAA 1111 या क्रमांकात DL म्हणजे दिल्ली, पुढील सांकेतिक शब्द C हा वाहन प्रकार सांगणारा आहे. कार, एसयुव्हीसाठी C हा शब्द , दुचाकीसाठी S, इलेक्ट्रिक वाहनासाठी E, सार्वजनिक वाहतुकीतील बसेससाठी P, तीनचाकी रिक्षांसाठी R, टुरिस्ट परवानाधारक वाहनांसाठी T,पिक अप वाहनांसाठी V, भाडेतत्वावर असलेल्या वाहनांसाठी Y हे सांकेतिक अक्षर असतात. त्यामुळे दुचाकीवरील क्रमांकामुळे मोठा गोंधळ झाला असल्याचे दिसून येते.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Omicron : तुम्हाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं कसं ओळखणार? जाणून घ्या कसं शोधायचं या नव्या व्हेरियंटला