Saurabh Bhardwaj on Raghav Chadha: आम आदमी पार्टीचे नेते, माजी आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाज यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत खासदार राघव चड्डा यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे. या व्हिडिओमध्ये भारद्वाज यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना म्हटले आहे की, "गेल्या काही दिवसांत आम्ही पाहिले आहे की, जो कोणी सरकारविरुद्ध गंभीर मुद्दे उपस्थित करतो, प्रश्न विचारतो किंवा लोकांच्या हिताची बातमी करतो, त्याला सरकार हुकूमशहाप्रमाणे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (ट्विटर, फेसबुक, यूट्यूब) बॅन करत आहे. त्यांच्यावर एफआयआर दाखल केले जात आहेत आणि खोटे खटले चालवले जात आहेत. संसदेत कोणी पीआर जनसंपर्क केला तरी सरकारला त्याची पर्वा नसते. कारण छोट्या पक्षाकडे संसदेत खूप मर्यादित वेळ असतो. जर कोणी समोशांचा मुद्दा उपस्थित करत असेल, तर त्यांनी देशासमोरील मोठे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत."
अशी भीतीची राजकारण कशी चालणार?
चड्डा यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना भारद्वाज पुढे म्हणाले की, "संपूर्ण देशात खऱ्या मतदारांची नावे कापली जात असून बोगस मतांच्या जोरावर यंत्रणेवर ताबा मिळवून निवडणुका जिंकल्या जात आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध (CEC) महाभियोग प्रस्ताव आणण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी प्रयत्न केला, पण तुम्ही त्यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. संसदेत जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष सभात्याग करतात, तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत नसता. पंतप्रधान किंवा भाजप सरकारला प्रश्न विचारेल असा एकही मुद्दा तुम्ही सभागृहात मांडलेला नाही. अशी भीतीची राजकारण कशी चालणार?"
हुकूमशाही विरोधात लढण्याऐवजी पळ काढल्याचा आरोप
सौरभ भारद्वाज यांनी सुनावले की, आम्ही सर्व अरविंद केजरीवाल यांचे निष्ठावान शिपाई आहोत आणि 'जो डर गया, समझो मर गया' हेच आमचे ब्रीद आहे. मात्र, जेव्हा मुख्यमंत्री केजरीवाल यांना खोट्या प्रकरणात अटक करण्यात आली, तेव्हा राघव चड्डा देशात नव्हते. "तुम्ही देशाबाहेर जाऊन कुठेतरी लपला होतात," अशा शब्दांत भारद्वाज यांनी चड्डांच्या अनुपस्थितीवर कडाडून टीका केली.
गंभीर मुद्द्यांकडे पाठ आणि 'सॉफ्ट पीआर'वर भर
संसदेत पंजाबचे आणि देशाचे महत्त्वाचे प्रश्न मांडण्याऐवजी चड्डा केवळ 'सॉफ्ट पीआर'मध्ये व्यस्त असल्याचा आरोप भारद्वाज यांनी केला आहे. "संसदेत पक्ष देतो तो मर्यादित वेळ समोशांसारख्या किरकोळ विषयांवर खर्च करण्यापेक्षा देशाच्या मोठ्या मुद्द्यांवर बोलणे गरजेचे आहे. गुजरातमध्ये पक्षाच्या 160 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले, त्यांना अटक झाली, तरीही तुम्ही गप्प राहिलात. ज्या पंजाबने तुम्हाला निवडून दिले, तिथले मुद्दे मांडायलाही तुम्ही आता घाबरत आहात," असे भारद्वाज यांनी व्हिडिओत म्हटले आहे.
म्हणून भाजप तुम्हाला पाठिंबा देत आहे
भारद्वाज यांनी चड्डांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देताना एक धक्कादायक विधान केले. ते म्हणाले, "तुमच्या या 'मृदू' भूमिकेमुळेच कदाचित भारतीय जनता पक्ष तुम्हाला सोशल मीडियावर पाठिंबा देत आहे. तुम्ही कुठून सुरुवात केली होती आणि आज कुठे येऊन पोहोचला आहात, याचा विचार करा. देशाला आज निडर आणि धाडसी नेतृत्वाची गरज आहे, जे भाजपच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारू शकेल." असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
