मुंबई/अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी सट्टा बाजार तेजीत आहे. विविध न्यूज चॅनलच्या एक्झिट पोलनंतर सट्टा बाजारातही सर्व्हे सुरु आहे. मात्र सट्टा बाजारातील सर्व्हे कोणत्या सॅम्पलच्या नाही, तर अंदाजाच्या आधारावर सुरु आहे. त्यामुळे गुजरातमध्ये यावेळीही भाजपचीच सत्ता येईल, असा सट्टा बाजारचा अंदाज आहे.
मुंबईच्या सट्टे बाजारातील आकडे
गुजरातमध्ये भाजपला 102 ते 104 जागा, तर काँग्रेसला 70 ते 74 जागांचा अंदाज मुंबईतील सट्टे बाजारात वर्तवला जात आहे. इतरांच्या खात्यात 3 ते 5 जागा जाऊ शकतात.
गुजरातच्या सट्टे बाजारातील आकडे
गुजरातच्या सट्टे बाजारानुसार, भाजपला 103 ते 105 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 74 ते 76 आणि इतरांना 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
भाजप आणि काँग्रेसला 18 डिसेंबरला किती जागा मिळतील, यावर सट्टा लावला जात आहे. भाजपला 110 जागा मिळतील, यावर जास्त सट्टा लावला जात आहे.
कुणाला किती भाव?
भाजपने 110 जागा जिंकण्याचा भाव 3 रुपये 40 पैसे आहे, म्हणजे एक रुपया लावल्यानंतर 4 रुपये 40 पैसे मिळतील. तर भाजपला 125 जागा मिळण्याचा भाव 4 रुपये 50 पैसे आहे. विशेष म्हणजे भाजपच्या मिशन 150 चा भाव 9 रुपये आहे. म्हणजेच भाजप दीडशेच्या पुढे जाईल, असा जास्तीत जास्त सट्टेबाजांना विश्वास नाही.
काँग्रेससाठी भाव काय?
सट्टे बाजारात काँग्रेसने 99 जागा जिंकण्याचा भाव 7 रुपये आहे. तर 75 जागांचा भाव 5 रुपये 20 पैसे आहे. सट्टे बाजारात ज्यावर जास्त बोली लावली जाते त्याची शक्यता कमी असते. म्हणजेच सट्टा बाजारच्या अंदाजानुसारही काँग्रेसला 99 जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे.