Sanjay Raut: चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Scathing Attack on Congress: कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची असताना चंद्रपूरमध्ये घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेसकडून टीका करण्यात आली.

Sanjay Raut Scathing Attack on Congress: चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटानं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर एकच चर्चा रंगली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची असताना चंद्रपूरमध्ये घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेसकडून टीका करण्यात आली. मात्र, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 27 नगरसेवक चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आणूनही सत्ता आली नाही, याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे असेही ते म्हणाले. त्यामुळे तुम्हाला जे पाठिंबा देणार होते त्यांना सुद्धा वेगळा निर्णय घ्यावा लागल्याचे ते म्हणाल. त्यामुळे शिवसेनेला दोष देण्यात काहीच अर्थ नसल्याचे ते म्हणाले.
मुंबईमध्ये आम्ही चर्चा करणार
दरम्यान, स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाऊ नका असं सांगण्यात आल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये गेल्यानंतर आम्ही या मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. चंदपूरमध्ये काँग्रेसच्या दोन गटात सत्ता गमवावी लागली आहे. प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यामध्येच संघर्ष पेटल्याने सत्ता गमवावी लागली आहे. हा दिल्लीपर्यंत पोहोचूनही दोघांच्या भूमिकेत कोणताच बदल झालेला नाही.
चंद्रपूरची बातमी सामनामध्ये नाहीच!
दुसरीकडे, चंद्रपूर महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला दिलेला पाठिंबा आणि भाजपचा चंद्रपूर महापालिकेत बसलेला महापौर आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचा बसलेला उपमहापौर ही महत्त्वाची बातमी सामना वृत्तपत्रात छापली गेली नाही. सामनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची अधिकृत भूमिका, पदाधिकारी नेत्यांवर होणारी कारवाई, पदांमधील बदल, पक्षप्रमुखांची भूमिका, अग्रलेखातून विविध विषयांवर भूमिका छापून येतात. मात्र, जिथं ठाकरेंच्या शिवसेनेचा उपमहापौर बसला आणि भाजपला पाठिंबा देत भाजपचा महापौर बसवला गेला तीच बातमी सामनामध्ये देण्याचं का टाळलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सामनाच्या राज्यातील कुठल्याही आवृत्तीमध्ये ही बातमी छापण्यात आलेली नाही.
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेची अडचण निर्माण झाली. त्यामुळे बातमी छापणं टाळलं का? असा प्रश्न निर्माण होत आहे. काही झालं तरी भाजपसोबत जाऊ नका अशा सूचना उद्धव ठाकरेंनी स्थानिक नेत्यांना दिल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. मात्र, या सगळ्याची बातमी सामनामध्ये छापून न आल्याने चंद्रपूर महापालिकेमध्ये पक्षाने घेतलेल्या निर्णयामुळे पक्षाची अडचण झाल्याचं कळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























