S Jaishankar On Operation Sindoor: एकीकडे ऑपरेशन सिंदूरदरम्यान (Operation Sindoor) भारत-पाकिस्तान युद्धविरामाबाबत (India Pakistan ceasefire) अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केलेल्या विधानावर विरोधक अजूनही केंद्र सरकारवर टीका करत आहेत. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानमधील सीझफायर घडवून आणले, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. दुसरीकडे या प्रकरणात कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप नव्हता, असे केंद्र सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी पुन्हा एकदा भारताची भूमिका मांडली आहे. “आम्ही सर्व देशांना हेच सांगितले की, पाकिस्तान थांबला, तरच आम्ही थांबू; अन्यथा कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, ” असे एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. 

परराष्ट्र व्यवहार सल्लागार समितीच्या बैठकीत एस. जयशंकर यांनी सहभाग घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी त्यांनी परकीय हस्तक्षेपाबद्दल बोलताना म्हटले की, जेव्हा जेव्हा कोणत्याही देशाने आम्हाला विचारले तेव्हा आम्ही फक्त एवढेच म्हटले की, जर त्यांनी गोळीबार केला तर आम्ही गोळीबार करू, जर ते थांबले तरच आम्ही थांबू. याशिवाय, सिंधू पाणी कराराबद्दल जे काही होईल ते देशाच्या हिताचे असेल आणि चांगलेच असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

अमेरिकेच्या हस्तक्षेपाबद्दल काय म्हणाले एस जयशंकर?

या बैठकीत एस. जयशंकर यांनी परराष्ट्र व्यवहार सल्लागार समितीच्या सदस्यांना सांगितले की, ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या टप्प्यानंतर जेव्हा अमेरिकन सचिवांनी सांगितले की, पाकिस्तान मोठा हल्ला करू शकतो, तेव्हा आम्ही उत्तर दिले की जर पाकिस्तान मोठा हल्ला करेल तर आम्ही त्यापेक्षा मोठा हल्ला करण्यास तयार आहोत, असे त्यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीसंदर्भातील पोस्टवर परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, दोन्ही डीजीएमओंमधील चर्चेमुळे युद्धबंदी झाली आणि त्यात कोणत्याही देशाची भूमिका नव्हती, असे एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.   

'त्या' विधानावर काय म्हणाले परराष्ट्रमंत्री?

दरम्यान, 'ऑपरेशन सिंदूर' राबवण्यापूर्वी पाकिस्तानला त्याची माहिती दिली होती, अशा आशयाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे एक कथित वक्तव्य चर्चेत आले होते. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या या वक्तव्याचा दाखला देत परराष्ट्र मंत्र्यांसह सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. एस. जयशंकर यांनी याबाबतही पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले. ऑपरेशन सिंदूर हे जेवढा वेळ चालले, त्यानंतर काही वेळातच पाकिस्तानला कळवण्यात आले होते की, आमच्याकडून फक्त दहशतवादी ठिकाणांनाच लक्ष्य करण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर, परराष्ट्रमंत्र्यांनी समितीच्या सदस्यांना आवाहन केले की, जर तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल, तर ती थेट सरकारकडून घ्या. या प्रकरणावर माध्यमांमध्ये जाऊन ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित करू नका, कारण त्यामुळे वातावरण बिघडते, पाकिस्तानला संधी मिळते आणि ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही, असेही जयशंकर म्हणाले. 

आणखी वाचा 

NIA Arrested CRPF Jawan : ज्योती मल्होत्रानंतर आणखी एक गद्दार सापडला, CRPF जवानाला बेड्या; NIA ची दिल्लीत मोठी कारवाई