नवी दिल्ली: रशिया- युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आता केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह पोहोचले असून त्यांनी युक्रेन-पोलंडच्या सीमेवर बुडोमेझ या ठिकाणी भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना खाद्यपदार्थ आणि पाण्याचे वाटप केलं. भारतीय विद्यार्थ्यांचे मनोबल हे उंचावलं आहे आणि त्यामुळे मी प्रभावित झालो आहे असं जनरल व्ही.के सिंह म्हणाले. त्यांनी या संबंधी एक ट्वीट केलं आहे. जनरल व्ही. के. सिंह यांचा या संबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
युक्रेनमधून हे विद्यार्थी पोलंडच्या सीमेपर्यंत आले असून त्यांना लवकरच पोलंडमध्ये प्रवेश देण्यात येईल आणि सुखरुप मायदेशी परत आणण्यात येईल असं जनरल व्ही. के. सिंह म्हणाले.
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती गंभीर होत चाललीय. अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून 'ऑपरेशन गंगा' अभियान राबवलं जातंय. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडकडून मदतीचा हात मिळतोय. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह पोलंडमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी पोलंडमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची चर्चा केली असून त्यांना सुखरुप मायदेशी नेणार असल्याचे आश्वासनही दिले आहे. यावेळी भारताचे पोलंडमधील राजदूत नगमा मल्लिक हे उपस्थित होते.
भारतीयांच्या सुटकेसाठी चार मंत्री युक्रेन शेजारील देशांमध्ये
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये पाठवण्यात आलं आहे. त्यात रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंग पोलंडमध्ये पोहोचलेत. युक्रेनमधून भारतीय मोठ्या संख्येनं पोलंडच्या सीमेवर दाखल झाले आहेत. भारतीयांच्या प्रवासात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी भारतीय दूतावासाकडून प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदेही रोमानियाच्या बुखारेस्टमध्ये दाखल झाले आहेत. युक्रेनमधून बुखारेस्टमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनीही संवाद साधला.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी पोलंडचे राष्ट्रपती अँड्रेज डुडा यांच्याशी चर्चा केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी मदत केल्याबाबत मोदींनी त्यांचे आभार मानले आहेत.
संबंधित बातम्या: