नवी दिल्ली: रशिया-युक्रेन या दोन देशांदरम्यान युद्ध भडकल्याचा परिणाम कच्च्या तेलांच्या किंमतीवर होत आहे. या जागतिक परिस्थितीवर आपण बारकाईने लक्ष ठेऊन असून तेलाच्या किंमती आणि त्याचा पुरवठा सध्या नियंत्रणात असल्याचं आश्वासन केंद्र सरकारने दिलं आहे. 


या संबंधी पेट्रोलियम मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपण जागतिक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. कच्च्या तेलाचा पुरवठ्यामध्ये अडचणी येणार नाही यासाठी आवश्यक ती पाऊलं उचलली जात आहेत. स्थिर किंमतीवर हा नागरिकांना हा पुरवठा कायम राहिल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. 


स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह मधील तेल खुलं करणार
भविष्यकाळात जर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये अडचणी आल्या तर केंद्र सरकार आपल्या स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधील तेल बाजारात आणेल. त्यामुळे बाजारातील अस्थिरता होणार नाही तसेच क्रुड ऑईलच्या किंमतीवरही नियंत्रण राहिल असं पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटलं आहे. 


उत्तर प्रदेशातील निवडणुकीनंतर तेलाच्या किंमती वाढणार?
गेल्या 113 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ झाली नाही. पण सध्याची भू-राजकीय परिस्थिती पाहता त्यामध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर कदाचित देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 


रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचा परिणाम थेट तेलाच्या किंमतीवर होणार आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढून महागाईचा भडकाही होण्याची शक्यता आहे.


आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या कच्च्या तेलाची किंमत ही प्रति बॅरेल 97.93 डॉलर इतकी आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पहिल्याच दिवशी त्यामध्ये वाढ होऊन ती 101.99 डॉलरवर पोहोचली होती. 2014 नंतर ही विक्रमी वाढ आहे. 


युद्धाची झळ भारतीय स्वयंपाक घराला
युद्ध जाहीर झाल्याच्या पहिल्याच दिवशी देशातील खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. खाद्यतेलाच्या किंमतीत क्विंटलमागे एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. या भाववाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. दरम्यान, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे सरकारला 1 लाख कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे.


दरम्यान, रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम भारतीयांना देखील भोगवा लागत आहे. त्याचा झळा भारतीयंना लागणार आहेत. खाद्यतेलांच्या किंमतीत वाढ झाल्याने युद्धाची झळ थेट देशातील स्वयंपाक घराला बसणार आहे. काही ठिकाणी तेलांची साठेबाजी देखील सुरू असल्याची माहिती आहे. सुर्यफूल, सोयाबीन, शेंगदाणा तेलाच्या किंमतीत प्रतिकिलो 5 ते 10 रुपयांनी वाढले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय.