Rush at Railway Stations and Bus Depot : सध्या देशात सर्वत्र दिवाळीचा (Diwali 2023) उस्ताह पाहायला मिळत आहे. सर्व जण कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. अनेक लोक कामानिमित्त शहरात असतात, सणासुदीच्या निमित्ताने घरी जाऊन कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी सध्या लाखो जण प्रवास करताना दिसत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अनेक जणांनी गावचा रस्ता धरला आहे. परिणामी रेल्वे स्टेशन आणि बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.


लाखो प्रवासी त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी रेल्वे प्रवास करत घरी जाण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे रेल्वे स्थानक आणि ट्रेनमध्ये खचाखच भरलेली गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमुळे रेल्वे प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.






भारतीय रेल्वेला गर्दी योग्य पद्धतीने हाताळता आली नसल्याने त्यांच्यावर आता टीका होत आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडीओंमध्ये खचाखच भरलेल्या रेल्वे गाड्या, डब्यांच्या बाहेर लांबलचक रांगा लागल्याचं दिसत आहे. त्याशिवाय गर्दीमुळे अनेक प्रवासी अडकलेले असल्यामुळे ते गंतव्यस्थाी पोहोचू शकलेले नाहीत. 






एक्स (X) म्हणजेच पूर्वीचं ट्विटरवर एका व्यक्तीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कॅप्शन देत त्याने रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराला लक्ष्य केलं आहे. या प्रवाशाने रेल्वेचं कन्फर्म तिकीट विकत घेतल्याचा दावा केला आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, कन्फर्म रेल्वे तिकीट खरेदी केल्यानंतरही त्याला गुजरातच्या वडोदरा येथे ट्रेनमध्ये प्रवेश करता आला नाही, ज्यामुळे त्याचा प्रवास चुकला.


या घडल्या प्रकाराबाबत त्याने रेल्वे मंत्र्यांना टॅग करत निषेध व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, "भारतीय रेल्वेचे सर्वात वाईट व्यवस्थापन. माझी दिवाळी उध्वस्त केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्याकडे कन्फर्म केलेले 3rd AC तिकीट असतानाही तुम्हाला हेच मिळते. पोलिसांची मदत नाही. माझ्यासारख्या अनेकांना ट्रेन चढता आले नाही."