नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत बुधवारी सकाळीच अनेकांच्या पोटात गोळा आणणारी अफवा पसरली होती. बातमी होती जवळपास शंभर शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीची (Delhi Bomb Threat). प्रत्यक्ष पडताळणीनंतर या बातमीत तथ्य नसल्याचे समोर आले. परंतु तोपर्यंत शाळकरी मुलांना आणि पालकांची मात्र तारांबळ उडाली होती. शेवटी ही अफवाच असल्याचं स्पष्ट झाल्यावर शाळकरी मुलांनी सुट्टी एन्जॉय केली. मात्र गुरूवारी पुन्हा शाळा सुरू होणार की नाही याबाबत मात्र अद्याप अस्पष्टता आहे.  


राजधानी दिल्लीतील शंभर शाळांमध्ये बॉम्ब असल्याचे ईमेल दिल्ली पोलिसांना आला. त्यामुळे बुधवारची सकाळ दिल्लीतील विद्यार्थी आणि पालकांची तारांबळ उडवणारी ठरली. त्यानंतर अग्निशमन दलाला जवळपास साठ फोन आले. या अफवेनंतर दिल्लीतील सर्व शाळांमध्ये अचानक सुट्टी जाहीर केल्याची घोषणा करण्यात आली.


पालकांनी मुलांना घरी नेलं 


सर्व शाळांनी पालकांना आपापल्या पाल्याला शाळेतून घरी नेण्याच्या सूचना पाठवल्या. तोपर्यंत सर्व विद्यार्थी शाळांच्या मैदानात थांबले होते . पहिले काही तास दिल्लीतील शाळकरी विद्यार्थी गोंधळले होते. दिल्लीत बॉम्बची धमकी असलेला मेल येताच प्रशासनाने तत्परता दाखवत शाळा रिकामी केल्या. अनेक शाळांमधून मुलांना घरी पाठवण्यात आले. सोशल मीडियावर बॉम्बची बातमी व्हायरल होताच पालकांनीही शाळा गाठून मुलांना घरी नेण्यास सुरुवात केली.


शाळांमध्ये बाँब ही अफवाच


थोड्या वेळाने बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे हा प्रकार दिल्लीतील बऱ्याच शाळांबाबत घडल्यामुळे अनेक ठिकाणी पालक स्वतःहून आपल्या मुलांना घरी नेण्यासाठी शाळेत पोहचले होते. शेवटी हा सगळा प्रकार अफवा असल्याचं स्पष्ट झालं. दिल्ली पोलिस याविषयी तपास करत आहेत. 


दिल्लीतील शाळा उद्या सुरू होणार का? 


नोएडा पोलिसांचे म्हणणे आहे की गुरुवारी (2 मे) रोजी नोएडातील शाळा सुरू होतील पण दिल्लीतील शाळांची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.


गौतम बुद्ध नगरमध्ये 2 मे रोजी शाळा सुरू होणार असल्याची माहिती नोएडाच्या पोलीस आयुक्तांनी दिली आहे. दिल्ली आणि नोएडातील सर्व शाळांची झडती घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या शोधात काहीही मिळाले नाही. त्यामुळे हा फेक कॉल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


या आधी दोन गुजराती नागरिकांना ताब्यात घेतलं होतं


याआधी एप्रिल महिन्यात दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर दोन प्रवाशांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना अणूबॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रवाशांना ताब्यात घेतलं होतं. ही घटना 5 एप्रिल रोजी घडली होती. हे दोन्ही प्रवासी गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी होते. जिग्नेश मालानी आणि कश्यप कुमार लालानी अशी त्यांची नावे होती.


ही बातमी वाचा :