नवी दिल्ली : "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देश नागपुरातून चालवायचा आहे. देशाच्या संविधानाला डावलण्याचा संघाचा प्रयत्न आहे", अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. आज नवी दिल्ली येथे आयोजित अल्पसंख्यांक संमेलनामध्ये राहुल बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले की, "मोदी सरकारचा रिमोट कंट्रोल संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांच्याकडे आहे. आपल्याला असे वाटते की, देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. परंतु हे साफ खोटं आहे. प्रत्यक्षात संघाकडून हा देश चालवला जात आहे."

राहुल गांधी म्हणाले की, "देशातल्या प्रत्येक सरकारी संस्थेत संघाचा एक तरी माणूस असला पाहिजे हा मोदी सरकारचा आग्रह आहे. परंतु आमची सत्ता आल्यानंतर आम्ही संघाशी संबंधित प्रत्येक माणसाला हाकलून देऊ."

राहुल म्हणाले की, "हा देश ज्या मूलभूत तत्वांवर उभा आहे, त्या प्रत्येक तत्वाला उखाडण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे." याबाबत अधिक स्पष्टपणे बोलताना राहुल यांनी सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे उदाहरण दिले. राहुल म्हणाले, "चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला काम करू दिले जात नाही, असा आरोप केला होता. भारतीय लोकशाहीसाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब ठरली होती."