उज्जैन/ तिरुअनंतपुरम : केरळमध्ये संघ स्वयंसेवकांच्या हत्यांविरोधात रा.स्व.संघाच्या वतीने देशभरात निदर्शने सुरु आहेत. त्यासाठी संघाच्यावतीने मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये निदर्शनं करण्यात येत होती. या निदर्शनावेळी संघाच्या एका नेत्याने केरळच्या मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन नवा वाद ओढवून घेतला आहे. कुंदन चंद्रावत असं संघाच्या या नेत्याचं नाव आहे.
चंद्रावत यांनी केरळच्या मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची हत्या करणाऱ्याला 1 कोटींचं बक्षीस जाहीर केलं करुन हा वाद निर्माण केलाय. चंद्रावत आपल्या घोषणेवर ठाम असून, बक्षीसाची रक्कम उभी करण्यासाठी आपण आपलं घर विकणार असल्याचंही सांगितलंय.
चंद्रावत यांच्या वक्तव्याला उत्तर म्हणून मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षानेही चंद्रावत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. केरळचे माकप सचिव कोदियेरी बालकृष्णन यांनी चंद्रावत मुख्यमंत्र्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत, असं म्हणलं आहे. तसेच संघाने माकपच्या वाट्याला जाऊ नये, असा इशारा दिलाय.
केरळमध्ये संघ स्वयंसेवकांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये बुधवारी जनाधिकार समितीच्या वतीनं एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना उज्जैनचे प्रांत प्रचारक चंद्रावत यांनी, जो व्यक्ती केरळच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करेल, त्यांना मी माझ्या संपत्तीमधून एक कोटी रुपये बक्षीस देईन. असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तसेच या देशातील गद्दारांना देशात राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे मी या बक्षिसाची घोषणा करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
तर दुसरीकडे चंद्रावत यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी खेद व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशमधील माकपचे राज्य सरचिटणीस बादल सरोज यांनी यासंदर्भात गुरुवारी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करुन संघाच्या पदाधिकाऱ्याचे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचं म्हणलं आहं. त्यामुळे राज्यातील पोलीस याप्रकरणी योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मध्य प्रदेशचे विरोधी पक्षनेते अजय सिंह यांनी यावर प्रतिक्रिया देताना, चंद्रावत यांचे हे वक्तव्य उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी केलं असल्याचं म्हणलं आहे. तर काँग्रेसचे आमदार मुकेश नायक यांनी चंद्रावत यांचं हे वक्तव्य तालिबानी मानसिकता दर्शवत असल्याचं सांगितलं आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता के.के मिश्रा यांनी तर चंद्रावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, चंद्रावत यांच्या या वक्तव्यावरुन संघाने आपले हात वर केले आहे. भोपाळमधील संघाच्या निदर्शनावेळी संघाचे अखिल भारतीय सह प्रचारप्रमुख जे. नंदकुमार यांनी केरळमध्ये सुरु असलेल्या घटनांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यातूनच अनेकजण आपलं मत नोंदवत आहेत. पण संघ त्याचं समर्थनही करत नसल्याचं सांगितलंय.
संबंधित बातम्या : केरळमध्ये संघ कार्यालयाबाहेर स्फोट, 4 स्वयंसेवक जखमी