भोपाळ: 'कोणलाही इतरांची देशभक्ती मोजण्याचा अधिकार नसल्याचं, परखड मत रा.स्व संघ सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. मध्य प्रदेशमधील बैतुलमध्ये आयोजित हिंदू संमेलनावेळी त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. भागवतांनी या वक्तव्याद्वारे भाजप नेत्यांना एकप्रकारे कानपिचक्या दिल्या आहेत.


भागवत म्हणाले की, ''मुस्लिमांच्या उपासना पद्धती वेगळ्या असतील, मात्र त्यांचं राष्ट्रीयत्व हिंदूच आहे. जे या देशात राहतात आणि इथल्या परंपरेचा आदर करतात, ते सर्व हिंदूच आहेत. त्यामुळे सर्व हिंदूंच्या राष्ट्रीयत्वाची जोपासना करणे हे प्रत्येक हिंदूची जबाबदारी आहे,'' असं परखड मतं त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

ते पुढे म्हणाले की, ''देशातील कोणत्याही समाजाच्या व्यक्तीला जगातील लोक हिंदू म्हणूनच ओळखतात. त्यामुळे सर्व भारतीय हिंदूच असून आपण सर्व एकच आहोत.''

भारताला विश्व गुरु स्थान मिळवून द्यायचे असल्याचे सांगून ते म्हणाले की, ''भारतासाठी आपण सर्व उत्तरादायी आहोत. त्यामुळे हिंदूंना आपसातील मतभेद विसरुन संघटीत होण्याची गरज आहे. संघटीत होऊन आपल्या दुर्बल घटकांवर चिंतन केलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मोहन भागवत सध्या मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असून 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी उज्जैनमधील संघ प्रचारकांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत.